मुंबई: कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्धार स्वातंत्र्यदिनी पुन्हा व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात केला, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, असे असताना गेल्या तीन चार वर्षात कमी पावसामुळे काही भागात दुष्काळाचे संकट अनुभवले आहे. त्यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल. तसेच वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा योजनेत 480 कि.मी.चा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतिमानतेने पूर्ण करुन संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीतून तिन्ही सैन्यदले, एनडीआरएफ, एसडीआरएफ, तटरक्षक दल आदींनी प्रचंड मेहनत करुन अव्याहत काम करुन करुन सुमारे 5 लाख नागरिकांची यशस्वी सुटका केली. पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे आहे. पुनर्वसनासाठी 6 हजार 800 कोटींचे पॅकेज तयार केले असून विक्रमी वेळेत पुनर्वसन केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
Share your comments