1. बातम्या

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. ‘ग्रामीण भारतातील उद्योग’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा ‘महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग’ साकारला आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या उपस्थितीत (दि. 14 नोव्हेंबर रोजी) होणार आहे.

प्रगती मैदान येथे दि. 14 ते 27 नोव्हेंबर 2018 या कालावधीत वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्या वतीने 38 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या वतीने ‘महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग’ हे राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.

संस्कार भारती रांगोळीच्या धर्तीवर महाराष्ट्र दालनाची सजावट करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण उद्योजकांचे 13 आणि महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचा एक असे एकूण 14 स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. ग्रामीण उद्योगाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघुउद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी विषयांना स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन यंदा राज्याच्या वतीने उभारण्यात आले आहे. 

महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत 14 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 3 वाजता प्रगती मैदान येथील ‘हॉल क्रमांक 12-अ’ मध्ये होणार आहे. याप्रसंगी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार आणि निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय आदी उपस्थित राहणार आहेत.

20 नोव्हेंबर रोजी साजरा होणार ‘महाराष्ट्र दिन’ 

व्यापार उद्येागासह या मेळाव्यात सहभागी विविध देश आणि राज्यांच्या वतीने आपली सांस्कृतिक परंपरा दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो. याअंतर्गत 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रगती मैदान येथील ‘हंसध्वनी रंगमंच’ येथे ‘महाराष्ट्र दिन’ साजरा होणार आहे. मुंबई येथील पृथ्वी आर्ट ग्रुपचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार असून या माध्यमातून व्यापार मेळ्यास भेट देणाऱ्या देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन होणार आहे.      

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters