1. बातम्या

महालक्ष्मी सरस प्रदर्शन 17 जानेवारीपासून

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
मुंबईकरांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले आणि ग्रामीण भागातील बचतगटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा शुक्रवार 17 जानेवारीपासून सुरु होत आहे. यंदा प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासह 29 राज्यातील स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण महिला कारागीर सहभागी होणार आहेत.

यंदा प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासह 29 राज्यातील स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण महिला कारागीर सहभागी होणार आहेत. यामध्ये 511 स्टॉल असणार असून त्यापैकी 70 खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. शॉपींगची आवड असलेल्या व्यक्ती आणि खवय्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन वांद्रे (पूर्व) येथील बीकेसीमधील एमएमआरडीए मैदान क्रमांक 1,4,5 आणि 6 येथे 17 जानेवारीपासून 29 जानेवारी पर्यंत सुरु असेल. प्रदर्शन सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामुल्य आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतील. जास्तीत जास्त नागरीकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी व गावांमधून आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

'महालक्ष्मी सरस'च्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल स्वयंसहाय्यता गट दरवर्षी करत असतात. मागील दीड दशकात महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अंदाजे 8 हजार स्वयंसहाय्यता समूहाने मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्यावर्षी 50 लाखाची आर्थिक उलाढाल झाली होती तर मागील वर्षी जवळपास 12 कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे आणि कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा

ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, ग्रामीण भागातील खाद्य पदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. यामध्ये जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी व तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सोलापुरची शेंगाचटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ इत्यादी बाबी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय कोल्हापुरी चप्पल, आदीवासी कलाकुसरीच्या वस्तू, पैठणी साड्या यांसह देशातील विविध 29 राज्यातील कारागिरांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करता येणार आहेत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters