महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (mahabeej) यावर्षी सोयाबीन बियाण्याचे दर ( Soybean seed rates) गेल्यावर्षी एवढेच ठेवले आहेत. त्यामुळे शतेकऱ्यांना दिलासा मिळाला असून, कंपनीचे बियाणे ७५ ते ८२ रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात बियाण्याचा पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना बियाण्याचे वेध लागतात. त्यात यंदा चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. शिवाय यंदाच्या हंगामात सोयाबीन दराची विक्रमी नोंद केली आहे.
सोयाबीन पिकास यंदा ऐतिहासिक भाव मिळाला असून, सर्वाधिक आठ हजार रुपयांपर्यंत सोयाबीन विकले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याचे भाव वाढण्याचे संकेत मिळत होते. शेतकऱ्यांनी त्याची तयारीही केली आहे. दरम्यान महाबीजने सोयाबीन बियाण्याचे दर स्थिर ठेवले असून, गेल्या वर्षीच्या दरानेच बियाणे यंदाही शेतकऱ्यांना मिळणार आहे.
असे आहेत सोयाबीन बियाण्याचे दर : जेएस ३३५ या वाणाची किंमत ७५ रुपये किलो असून, ३० किलोची बॅग दोन हजार २५० रुपयांना शेतकऱ्यांना मिळणार आहे. जेएस ९३०५, एमएएसयु ७१, जेएस ९५६० या वाणाची किंमत ७८ रुपये प्रतिकिलो असून, ३० किलोच्या बॅगसाठी दोन हजार ३४० रुपये मोजावे लागणार आहेत.एमएएसयु-१५८, डीएस-२२८ या वाणांची किंमत ८२ रुपये प्रतिकिलो असून, ३० किलोची बॅग दोन हजार ४६० रुपयांना शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागणार आहे.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments