‘महा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा

Wednesday, 06 November 2019 08:28 AM


नवी दिल्ली:
गुजरात, महाराष्ट्र तसेच दमण आणि दीव इथल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल्या तयारीचा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजेश गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. सध्याची परिस्थिती तसेच मदत आणि बचाव कार्याची सिद्धता याबाबत मंत्रिमंडळ सचिवांनी आढावा घेतला आणि गरज पडेल तेव्हा तात्काळ साहाय्य करण्याचे आदेशही दिले.

सध्या पूर्व मध्य अरबी समुद्रात असलेले ‘महा’ चक्रीवादळ पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेकडे सरकत असून 5 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर या वादळाचा जोर कमी होईल आणि 6 नोव्हेंबरची रात्र तसेच 7 नोव्हेंबरची सकाळ या दरम्यान हे वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला पार करेल. या काळादरम्यान ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि दीड मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

गुजरात आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी यावेळी हाती घेण्यात आलेल्या आवश्यक तयारीविषयी माहिती दिली. तसेच तटरक्षक दल आणि नौदलाची जहाजे यासह राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आदी सज्ज ठेवण्यात आल्याचीही माहिती दिली. या भागातील जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रातील मासेमारी थांबवण्यात आली आहे. दमण आणि दीवच्या प्रशासनानेही या संदर्भात माहिती दिली.

या बैठकीला गृह, संरक्षण मंत्रालय तसेच भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि निवारण पथकाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. गुजरात आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव तसेच केंद्रशासित प्रदेशातील प्रशासकीय अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
  

maha cyclone maha cyclone महा चक्रीवादळ महा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन national disaster management authority
English Summary: Maha Cyclone Alert for Maharashtra and Gujarat state

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.