मुंबई: 17 व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून दि. 10 पासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे, तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
श्री. कुमार यांनी सांगितले की, निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व यंत्रणा सज्ज आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघासाठी एकूण 4 टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघात 3 टप्प्यात मतदान झाले होते.
टप्पा | मतदान तारीख | जिल्हे |
1 | 11 एप्रिल 2019 | वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम. |
2 | 18 एप्रिल 2019 | बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर. |
3 | 23 एप्रिल 2019 | जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले. |
4 | 29 एप्रिल 2019 | नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण-मुंबई, मावळ, शिरुर आणि शिर्डी. |
आदर्श आचारसंहिता
संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा, शासकीय सार्वजनिक/खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत.
Share your comments