मुंबई: नवीन चारा येईपर्यंत सुरु असलेल्या जनावरांच्या छावण्या चालू ठेवणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत नियम 293 वरील प्रस्तावास उत्तर देताना दिली.
151 तालुके, 17 हजार 985 गावे व 85 लाख हेक्टरचे क्षेत्र अशा दुष्काळग्रस्त भागात राज्य शासनाच्या उपाययोजना सुरु आहेत. या ठिकाणी असलेल्या चारा छावण्यांना 472 कोटी रुपयांची मदत वितरित झाली असून जवळपास 1 हजार 600 छावण्या सुरु असून त्यात 10 लाख 72 हजार 534 पशुधन आहे. या छावण्यातील व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी काही कठोर अटी निश्चित करण्यात आल्या होत्या, असे मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
सर्व राष्ट्रीय व जिल्हा बँकाना शेतकरी कर्ज पुनर्गठन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यातील 43 कोटी 34 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्याची तांत्रिक तपासणी सुरु असून पात्र शेतकऱ्यांनी सहनिबंधक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यात रोजगार हमीच्या कामामध्ये 28 नव्या कामांचा मनरेगात समावेश केला आहे. 4 लाख 15 हजार 866 मजूर कामावर असून 38 हजार 214 कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गारपीठ व अन्य नैसर्गिक आपत्तीच्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही श्री. देशमुख यावेळी म्हणाले.
Share your comments