1. बातम्या

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पशुधन विकास महत्त्वपूर्ण घटक

KJ Maharashtra
KJ Maharashtra


अमरावती:
कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर अंशत: परिणाम झाला आहे. मुख्यत: ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती ढासळल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पशुधन विकास महत्त्वपूर्ण घटक आहे. पशुधन वाढीच्या माध्यमातून उत्पादन वाढविल्यास निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल, असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी येथे सांगितले.

येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आज मंत्री महोदयांनी भेट देऊन पशुसंवर्धन विभागाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जि.प. अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, पशुसंवर्धन विभागीय सह आयुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, सहायक आयुक्त डॉ. राधेश्याम बहादुरे, श्री. पेठे, विभागीय दुग्ध विकास अधिकारी श्री. सोनवणे यांचेसह पशुधन विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. केदार म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काहीसा परिणाम झाला आहे. संचारबंदीमुळे अनेक उद्योगधंदे व ग्रामीण क्षेत्रातून निर्मित उत्पादन विक्रीवर परीणाम झाला आहे. यामुळे ग्रामीण आर्थिक स्थिती ढासळल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतू यावर मात करण्यासाठी पशुधन वाढवून, त्या माध्यमातून उत्पादन वाढविल्यास आर्थिक स्थिती पूर्ववत होऊ शकते. यासाठी विभागाने दुभत्या जनावरांसाठी लागणारा चारा निर्मितीवर अधिक भर द्यावा. त्यासाठी कृषी विभागाच्या समन्वयाने कमी पाण्यात हिरवा चारा, मका पिकाचे उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत.

प्रारंभी त्यांनी जिल्ह्यात पशुधन संदर्भात आढावा घेतला. बॅक यार्ड पोल्ट्री ही अभिनव योजना असून वर्षाला पंधरा हजार कोंबडीचे पिल्लू यातून प्राप्त होते. तसेच अंडी सुध्दा मिळतात. दिड कोटी अंडी राज्याची दैनंदिन मागणी आहे. ‘अ’ जीवनसत्व मिळणाऱ्या या उत्पादनातून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते. ही योजना राबविण्यासाठी जिल्ह्याला 19 लाख रुपये अनुदान मिळाले आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. कोंबड्यांसाठी लागणारा मका हे खाद्य मोठ्या प्रमाणात उत्पादीत होण्यासाठी मका लागवडीसाठी प्रयत्न करावेत. तीन ते साडेतीन महिन्यात मिळणारे हे उत्तम खाद्य आहे. मका पिकावर पडणाऱ्या लष्करी अळीपासून संरक्षणासाठी नीम पावडरची नियमित फवारणी करण्यात यावी, असे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

बैठकीनंतर त्यांनी शहरातील एचव्हीपीएम परिसरातील सप्त गोमाता गौरक्षण संस्थेला व शासकीय दुग्ध विकास योजना केंद्राला भेट दिली. जिल्ह्यातील पोहरा स्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या केंद्राला तसेच वळूमाता प्रक्षेत्र येथे त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पशुधनाची पाहणी केली व विविध उपक्रम, विकासकामांचा आढावा घेतला. शेळी-मेंढी पालन केंद्राच्या 400 एकर जमीन तसेच वळूमाता प्रक्षेत्र केंद्राचा जागेवर हिरवा चारा निर्मितीसाठी नियोजन आराखडा व जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आदेश त्यांनी दिले. सायलेज मका पिकाची प्रजाती लागवड व उत्पादनासाठी नियोजन करावे.

शेळी-मेंढी तसेच गाई-वळूंना उन्हाळ्याच्या दिवसात चारा उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. दोन्ही केंद्रातून उत्तम जातीचे जनावर लोकांना मिळतील यासाठी संशोधन व नियोजनपूर्वक योजनांची अमंलबावणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाव्दारे अधिक दूध उत्पादनासाठी व शेती कामांसाठी आवश्यक असलेल्या सर्व पशुधनाला प्रभावरितीने उपचार, सुश्रूषा, रोगनिदान, शस्त्रक्रिया आदी सेवा दिल्या जातात. मोठ्या जनावरांची पोटाची शस्त्रक्रियेसह, डोळ्यांची शस्त्रक्रिया, पक्ष्यांवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत. तसेच कृत्रिम रेतन केंद्रातून दरवर्षी सुमारे नऊशेच्या जवळपास रेतन केल्या जाते, आदी माहिती पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. आर. एस. पेठे यांनी यावेळी मंत्री महोदयांना दिली.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters