मुंबई
'अबकी बार किसान सरकार' म्हणत राज्यात प्रवेश केलेल्या बीआसएस पक्षाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारने पुन्हा १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राज्यातील बीआसएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी पेढे देखील वाटले आहेत. तसंच शिंदे-फडणवीस सरकारने देखील अशा प्रकारे राज्यात कर्जमाफी करावी, अशी मागणीही बीआसएसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
तेलगणांचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी नव्याने १९ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचं जाहीर केले आहे. बुधवारी (ता.२) झालेल्या बैठकीत केसीआर यांनी अर्थ सचिवांना कर्जमाफीबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे ३ ऑगस्टपासून शेतकरी कर्जमाफी कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तेलंगणा सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड येथे पेढे वाटून, फटाके फटाके उडवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तेलंगणा राज्यातील सरकार हे करु शकते तर महाराष्ट्र सरकार हे का नाही करु शकत ? अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली.
दरम्यान, २०१८ साली रखडलेली कर्जमाफीची प्रक्रिया कधी सुरू करण्यात येईल, याबद्दल सरकारकडून कसलीही सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. परंतु आता मात्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केसीआर यांनी शेतकरी कर्जमाफीची प्रकिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे.
Share your comments