भविष्य सुरक्षित ठेवत चांगल्या विमा कव्हरसह उत्तम परतावा मिळणवण्यासाठी एलआयसीची आधारशिला पॉलिसी हा एक उत्तम पर्याय आहे. या पॉलिसीत मॅच्युरिटीच्या वेळेस विमाधारकाला एक निश्चिती रक्कम दिली जाते. जर मॅच्युरिटीच्या आधीच विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाते. या पॉलिसीत तुम्हाला रोज फक्त २९ रुपयांची बचत करून लाखो रुपयांची रक्कम उभी करता येते.
कोण घेऊ शकतो. एलआयसीची आधारशिला पॉलिसी ही फक्त महिलांसाठी आहे. ही पॉलिसी ८ ते ५५ वर्षांच्या वयोगटातील महिलांसाठी आहे. यामध्ये नियमित प्रिमियम भरावा लागतो. पॉलिसीचा अवधी १० ते २० वर्षांचा आहे. यामध्ये किमान विमा ७५,००० रुपयांचा आहे.
मॅच्युरिटीला मिळू शकतात 4 लाख रुपये
जर एखादी महिलेने ३१ वर्षी पॉलिसी घेतली आणि या पॉलिसीचा अवधी २० वर्षांचा असला तर ४.५ टक्के टॅक्ससोबत पहिल्या वर्षाचा प्रिमियम १०,९५९ रुपयांचा असेल. त्यानंतर २.२५ टक्क्यांसह फर्स्ट ईयर प्रिमियमनंतर हा प्रिमियम १०,७२३ रुपयांचा होईल. म्हणजेच रोज २९ रुपयांची बचत करावी लागेल. या पद्धतीने एकूण २,१४,६९६ रुपये जमा करावे लागतील. तुम्ही मासिक, तिमाही आणि सहामाही पद्धतीने प्रिमियम जमा करू शकता. २० वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळेस ३ लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल.
पॉलिसी रद्द केल्यानंतरसुद्धा सुविधा
आधारशिला पॉलिसीच्या प्रिमियम भरण्यासाठी एलआयसी १५ ते ३० दिवसांचा अतिरिक्त वेळ देते. जर तुम्हाला पॉलिसी रद्द करायची असेल तर त्याचाही पर्याय तुम्हाला दिला जातो. तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर १५ दिवसांच्या आत ती रद्द करू शकता.
एलआयसी ही देशातील आघाडीची विमा कंपनी आहे. एलआयसीच्या वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांसाठी आणि वेगवेगळ्या गरजांनुरुप विमा योजना बाजारात आहेत. आयुर्विमा आणि आरोग्यविमा हे आर्थिक नियोजनाचे महत्त्वाचे घटक आहेत. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांची काळजी घेण्यासाठी आयुर्विमा महत्त्वाचा असतो. तर वैद्यकीय खर्चासाठी आरोग्य विमा महत्त्वाचा असतो. अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे तुमची अनेक वर्षांची बचत खर्ची पडू शकते. त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीसाठी आरोग्यविमा घेणे श्रेयस्कर ठरते.
भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आणि आर्थिक उद्दिष्टांसाठी आर्थिक नियोजन करणे फार महत्त्वाचे असते. दरमहिन्याच्या नियमित उत्पन्नातून बचत करणे महत्त्वाचे असते. दर महिन्याला होणाऱ्या अनावश्यक खर्चाला टाळून बचत केली पाहिजे. केलेल्या बचतीला योग्य गुंतवणूक पर्यायात गुंतवले पाहिजे. त्यामुळे दीर्घ कालावधीत चांगली रक्कम उभी राहते. यातून आपल्याला भविष्यात लागणाऱ्या मोठ्या रकमांची तजवीज करता येते. स्वत:चे घर, गाडी, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, रिटायरमेंटनंतरचे आयुष्य यासाठीच्या खर्चासाठी तरुणपणातच आर्थिक नियोजन केले पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणुकीतूनच मोठी रक्कम उभी राहते. गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक करावी.
Share your comments