1. बातम्या

सर्वांनी मिळून काम करू आणि दुष्काळावर मात करू

मुंबई: ज्यातील दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे 48 तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनास आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी साधलेल्या संवादात मुख्य सचिव यु पी एस मदान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह जवळपास 500 जण सहभागी झाले होते.

KJ Staff
KJ Staff


मुंबई
: राज्यातील दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे 48 तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनास आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी साधलेल्या संवादात मुख्य सचिव यु पी एस मदान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह जवळपास 500 जण सहभागी झाले होते.

राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू आणि दुष्काळावर मात करू असे आवाहन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यासाठी 8879734045 हा व्हॉटस्ॲप क्रमांक जाहीर केला. टँकर, चारा छावण्यांची मागणी, रोहयो कामाविषयक स्थिती, जनावरांना चारा, पाणी, दुष्काळी अनुदान, पिकविमा यासारख्या दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर पाठवाव्यात त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार या सर्व प्रशासकीय यंत्रणेने संवादात तसेच व्हॉटस्ॲप क्रमांकावर नोंदवल्या जाणाऱ्या बाबींची नोंद घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा.

मुख्यमंत्री म्हणाले, टँकरने पाणीपुरवठा करताना 2018 ची लोकसंख्या विचारात घेऊन टँकरची संख्या निश्चित करण्यात यावी अशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. अधिग्रहित विहिरींसाठी पूर्वी फिक्स रक्कम दिली जात होती आता त्या विहीरीतून टँकरमध्ये किती पाणी भरले यावर निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गरजेनुसार चारा छावण्यांच्या अटी शिथील करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी या संवादादरम्यान सांगितले.

रस्त्यांची कामे करताना तलावांना क्षती पोहोचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, सर्व दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांनी त्यांच्या गावात जलसंधारणाची अधिकाधिक कामे घ्यावीत, त्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध आहे. नरेगाअंतर्गत २८ प्रकारची कामे कन्व्हर्जन करून करता येणार आहेत. त्यातूनही ग्रामसेवक-सरपंचांनी गावात जास्तीत जास्त कामे करावीत, त्यातून रोजगार निर्माण होताना मत्ताही उभी राहील, असेही ते म्हणाले.

ज्या ठिकाणी अतिरिक्त चारा छावण्यांची, टँकरची गरज आहे तिथली मागणी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून नोंदवली जावी असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात टँकरने पाणीपुरवठा करताना त्यावर जीपीएस सिस्टिम बसवण्यात आली आहे, त्यामुळे कोणत्या टँकरच्या कुठे आणि किती फेऱ्या झाल्या हे लक्षात येऊ शकेल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करत असून त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जात आहे, यात काही अडचणी असल्यास त्याचे निकष तपासून मदतीचे काम ही वेगाने केले जाईल.

ज्या गावात पाणी पुरवठ्याची योजना बंद पडली आहे पण तिथून गावाला पाणी मिळू शकते, अशा योजनेच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावेत, ती योजना दुरुस्त करून गावांना पाणीपुरवठा सुरु केला जाईल. चारा छावण्यांमध्ये मोठ्या जनावरांसाठी प्रती जनावर 90 रुपये आणि लहान जनावरांसाठी प्रती जनावर 45 रुपये दिले जातात. मुख्यमंत्र्यांनी चारा छावण्यांमधील जनावरांना टॅग करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे चारा छावण्यांमध्ये किती जनावरे आहेत याची माहिती मिळू शकेल असेही ते म्हणाले.

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना: जिल्हा औरंगाबाद

  • सर्व 9 तालुक्यात दुष्काळ जाहीर.
  • जिल्ह्यात 1,054 टँकर्सनी पाणीपुरवठा.
  • 156 विंधन विहिरी, 52 नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, 14 तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, 501 विहिरींचे अधिग्रहण, 8 राष्ट्रीय पेयजल योजना तर 4 मुख्यमंत्री पेयजल योजनांचे काम पूर्ण. उर्वरित योजना प्रगतीपथावर.
  • पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची 100 लाख रुपयांची थकित वीज देयके भरली.
  • चार तालुक्यात 6 शासकीय जनावरांच्या छावण्या. 6,733 मोठी, 936 लहान अशी मिळून 7,669 जनावरे चारा छावणीत दाखल.
  • 1,355 गावातील 5 लाख 40 हजार 236 शेतकऱ्यांना 376 कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत 774 कामे सुरु त्यावर 9,353 मजुरांची उपस्थिती. 64 हजार 767 कामे शेल्फवर.
  • जिल्ह्यात 4 लाख, 87 हजार 069 शेतकऱ्यांची 163 कोटी रुपयांची पीक विम्यासाठी नोंदणी. त्यापैकी 4 लाख 87 हजार 068 शेतकऱ्यांना 265.60 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात 1.74 लाख शेतकऱ्यांची नोंदणी, त्यापैकी 1.23 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी 24.73 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित.
  • उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु.

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना: जिल्हा जालना

  • जिल्ह्यातील 8 पैकी 7 तालुक्यात दुष्काळ घोषित.
  • एकूण 532 टँकर्सद्वारे जिल्ह्यात पाणी पुरवठा.
  • 194 नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, 39 तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, 630 विहिरींचे अधिग्रहण, 4 राष्ट्रीय तर 13 मुख्यमंत्री पेयजल योजनांचे काम पूर्ण. उर्वरित कामे प्रगतीपथावर.
  • पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची 237.97 लाख रुपयांची थकित वीज देयके भरली.
  • 11 शासकीय छावण्यांमध्ये जिल्ह्यात 4,992 मोठी, 997 लहान अशी मिळून 5,989 जनावरे दाखल.
  • 854 गावातील 4 लाख 73 हजार 876 शेतकऱ्यांना 330.39 कोटी रुपयांची दुष्काळी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात.
  • मग्रारोहयोअंतर्गत 263 कामे. त्यावर 7,368 मजुरांची उपस्थिती. 23,410 कामे शेल्फवर.
  • 2 लाख 64 हजार 637 शेतकऱ्यांची 63 कोटी रुपयांची पीक विम्याची नोंदणी, पैकी 37.37 कोटी रुपयांची रक्कम अदा.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 1.62 लाख शेतकऱ्यांची नोंदणी. त्यापैकी 59 हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 11.76 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु.

 

English Summary: Let us work together and fight with drought Published on: 09 May 2019, 07:38 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters