यावर्षी खरीप हंगाम तर अतिवृष्टीने वाया गेला होता. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन सारखी महत्त्वाची पिके मातीमोल झाली. परंतु या दोन्ही पिकांच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आल्याने तसेच शेतकऱ्यांनी शेतमालाच्या विक्रीचे व्यवस्थित नियोजन केल्याने या वर्षी कापूस आणि सोयाबीन चे भाव टिकून राहिले.
त्यानंतर रब्बी हंगामात देखील अवकाळी पावसाचा फटका बऱ्याच पिकांना बसला. त्याला हरभरा देखील अपवाद नाही. जर सद्य परिस्थितीचा विचार केला तर सध्या बाजारपेठेत रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक सुरू झाली आहे.हरभरा हमीभावाने विकता यावा यासाठी शासनाने नाफेड च्या माध्यमातून एक मार्चपासून हमीभावकेंद्रदेखील सुरू केलेली आहे. जर आपण हमीभाव केंद्रांवर चा भावाचा विचार केला तर हरभऱ्याला 5200 पर्यंत भाव आहे. त्या तुलनेने खुल्या बाजारात साडेचार हजार पर्यंत हरभऱ्याला भाव मिळत आहे. परंतु तरीदेखील शेतकऱ्यांची पसंती ही हमीभाव केंद्रांना नसून खुल्याबाजारात विक्रीला आहे. हरभऱ्यासाठी हमीभाव केंद्र सुरू होऊन वीस दिवस झाले तरीसुद्धा अपेक्षित आवक अजूनही होत नाही आहे. यापेक्षा जास्त आवक ही खुल्या बाजारात होत आहे.
जर हरभरा दराचा विचार केला तर खुल्या बाजारात मिळणारा भाव आणि हमीभाव केंद्रावर मिळणारा भाव यामध्ये 600 ते 700 रुपयांचा फरक आहे. हमीभाव केद्रावर मिळणारा भाव हा जास्त आहे. तरीसुद्धा शेतकरी का हमीभाव केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी आणत नाहीत. यामागे देखील काही कारणे आहेत.
शेतकरी का आणत नाहीत हमीभाव केंद्रावर हरभरा
हमीभाव केंद्रांवर हरभरा खरेदी सुरू आहे परंतु या केंद्रांवर असलेल्या नियम व अटी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत. हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीसाठी आणला आणि त्या हरभऱ्यामध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त आद्रतेचे प्रमाण असले तर हरभरा विकत घेतला जात नाही.त्यासोबत नोंदणी नुसार शेतकऱ्याला आपला मालघेऊन यावा लागतो. त्याशिवाय ऑनलाईन पीक पेरा आणि इतर कागदपत्रांची देखील पूर्तता करणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी या किचकट प्रक्रियेत न पडता थेट कमी भावजरी असला तरी खुल्या बाजाराला पसंती दिली आहे आणि
सगळ्यात महत्वाचे म्हणजे माल विक्री केल्यानंतर महिन्याभराने पैसे जमा होण्याची प्रक्रिया असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रांकडे हरभरा विक्रीच्या बाबतीत पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला म्हणजे हातात पैसे पाहिजेत. त्यामुळे केंद्राच्या किचकट प्रक्रियेत न पडता शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराला पसंती दिली आहे.
Share your comments