नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये मृदा आणि जलसंधारणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मृदा आणि जलसंधारणाच्या कार्यक्रमांमध्ये मृदसंधारणाला विशेष प्राधान्य दिले जाते. कारण पाण्याचा विचार केला असता दरवर्षी जलचक्रामुळे कमी-जास्त प्रमाणात तरी पाऊस पडतो.
परंतु मृदा निर्मितीची प्रक्रिया ही त्या मानाने प्रदीर्घ काळाची आहे. निसर्गात हवा, पाणी, सूर्याची उष्णता या विविध कारकांमुळे खडकाची झीज होते आणि खडकाचा भुगा तयार होतो. कालांतराने त्यामध्ये विविध जैविक घटक मिसळतात. आणि त्याचे मृदेमध्ये म्हणजेच मातीमध्ये रूपांतर होते. अशाप्रकारे एक इंच मातीचा थर तयार होण्यासाठी साधारणतः ४०० - १००० वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे मातीचे संवर्धन ही काळाची गरज आहे.
काय आहेत मातीच्या धुपाचे दुष्परिणाम
शेतीच्या दृष्टीने विचार केला असता, मातीची वरचा फक्त चार इंचाचा थर शेतीसाठी उपयुक्त असतो. कारण याच थरामध्ये पिकाच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषक द्रव्य सामावलेली असतात. जर मातीच्या संवर्धनाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर पाण्यासोबत पोषक द्रव्य सुद्धा वाहून जातात. परिणामी जमिनीची सुपीकता कमी होते. पिकाची उत्पादकता घटते आणि शेतकऱ्याला रासायनिक खते आदी बाहृय साधनांचा आधार घ्यावा लागतो .
काही ठिकाणी मातीचा थर हा मर्यादित असतो अशा ठिकाणी होणाऱ्या धूपेमुळे हळू हळू संपूर्ण मातीचा थरच वाहून जातो आणि खडक उघडा पडतो. अशा ठिकाणी भविष्यात पुन्हा शेती करणे अशक्यप्राय होऊन बसते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मृदा संधारणाची कामे केलेली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ प्रवाहाबरोबर वाहून आणला जातो आणि धरणात येऊन साठतो. गेल्या काही वर्षात अशाप्रकारे हजारो टन गाळाचे संचयन धरणात झालेले आहे. परिणामी धरणाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. याचे गंभीर परिणाम आपल्याला नजीकच्या काळात भोगावे लागणार आहेत. त्यामुळे मृदा संधारण गरजेचे बनले आहे.
मृदा संधारण उपाय
१. वृक्षारोपण
वृक्षांमुळे मृदांचे कण धरून ठेवले जातात व त्यामुळे मृदेचे वाहत्या पाण्यापासून संरक्षण होते .
२. पिकांची फेरपालट करणे.
वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घेणे जेणेकरून जमिनीची धूप कमी होईल.
३. आच्छादने
पीक लहान अवस्थेत असताना पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप आच्छादनामुळे कमी होते. तसेच कुरणांमुळे देखील मृंदावर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
४. बांध घालने
उतारावरच्या शेतीच्या भागात विशिष्ट उतारावर जर बांध घातले गेले तर पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाणारे मृदेचे थर बांधाजवळ साठवले जातील व मृदा सपाट होण्यास मदत होईल. त्यासाठी पुढील पद्धतीने बांध घातले जातात.
अ) समपातळीवरील वरंबे -: कमी पावसाच्या भागात व जमिनीत साधारणपणे ३ टक्केपर्यंत उतार असल्यास सम पातळीवरील वरंबे पाण्याला आवडू शकतात.
ब) ढाळीचे वरंबे
जास्त पावसाच्या भागात व जमिनीत साधारणपणे ५ -१० टक्के उतार असल्यास ढाळीचे वरंभे पाण्याला अडून जमिनीत पाणी मुरण्यास मदत करतात.
क) सरी-वरंबा पद्धत
जमिनीचा उतार १-३ टक्केपर्यंत असल्यास उतारास आडव्या सऱ्या वरंबे तयार करावे. दोन वरंब्यामधील सरीमध्ये पावसाचे पाणी मुरले जाते व वाहणाऱ्या पाण्यास अटकाव होऊन जमिनीची धूप कमी प्रमाणात होती.
५.जमीन नांगरतांना उताराच्या दिशेशी काटकोनात नांगरणी करणे. काटकोनात नांगरणी केल्यास उतारावरून वाहणाऱ्या पाण्याला प्रतिबंध होऊन मृदेची धूप कमी होण्यास मदत होते.
६. पायर्यांची शेती
डोंगराळ भागात जेथे उतारावर शेती केली जाते त्या जमिनीवर पायऱ्याची निर्मिती करून शेती केल्यास मृदेची धूप कमी होण्यास मदत होते. या सोपान शेती असे देखील म्हणतात.
लेखक
अजय एस. सोळंकी
मो़.नं.९०११४७२३३५
Email:- ajaysolanki0193@gmail.com
एम. एस. सी. ऍग्री
मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र
अजय डी. शेळके
एम. एस. सी. ऍग्री
मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र
गजानन एन. चोपडे
एम. एस. सी. ऍग्री
कृषी कीटकशास्त्र
Share your comments