1. बातम्या

राज्यातील पहिल्या 'मोबाईल फूड टेस्टींग लॅब' चा शुभारंभ

मुंबई: राज्यात आता विविध अन्नपदार्थांची मोबाइल फूड टेस्टिंग लॅबमार्फत (फिरती अन्न तपासणी प्रयोगशाळा) तपासणी होणार आहे. त्यासाठीच्या पहिल्या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचे आज राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
राज्यात आता विविध अन्नपदार्थांची मोबाइल फूड टेस्टिंग लॅबमार्फत (फिरती अन्न तपासणी प्रयोगशाळा) तपासणी होणार आहे. त्यासाठीच्या पहिल्या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचे आज राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राज्यात लवकरच अजून एक मोबाइल फूड टेस्टिंग लॅब दाखल होणार आहे. मुंबईसाठी स्वतंत्र मोबाइल फूड टेस्टिंग लॅब (फिरती अन्न तपासणी प्रयोगशाळा) असेल, अशी माहिती मंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सचिव डॉ. संजीव मुखर्जी, आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, अतिरिक्त आयुक्त सुनील भारद्वाज आदी मान्यवर उपस्थित होते.

या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेत एक अन्न सुरक्षा अधिकारी, एक विश्लेषक आणि परिचर यांची टीम कार्यरत असणार आहे. ही मोबाइल व्हॅन गर्दीच्या व खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये अन्न सुरक्षा व अन्न भेसळीबाबत जागरूकता करणार आहे. तसेच अन्नाची प्राथमिक तपासणी करणार आहे. या मोबाईल टेस्टिंग व्हॅनमध्ये दैनंदिन जीवनातील अन्नपदार्थ तसेच दूध, तूप, तेल, चहा पावडर, मसाले इ. यातील भेसळकारी पदार्थ ओळखणे शक्य होईल. या मोबाइल टेस्टिंग व्हॅनमध्ये अन्न सुरक्षेविषयी नियम व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारी माहिती देण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना मंत्री श्री रावल म्हणाले की, दूध आणि अन्न भेसळ रोखण्यासाठी तसेच लोकांना शुद्ध आणि आरोग्यदायी, पोषक आहार मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज ही फिरती अन्नपदार्थ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दुधाची तपासणी, साखर तसेच चहा पावडरमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीची तपासणी, भेसळ केल्या जाणाऱ्या रंगांची तपासणी करण्यास मदत होणार आहे.

चटणी व मसाले पदार्थात होणाऱ्या रंगांच्या भेसळीची तपासणीही करता येणार आहे. विविध प्रकारच्या तपासण्या फिल्डवर जाऊन करता येणार आहेत. या प्रयोगशाळेत अन्नपदार्थ तपासणीचा अहवाल लगेच मिळणार असल्याने भेसळ प्रकरणी तातडीने कार्यवाही करता येणार आहे. पूर्वी भेसळ प्रकरणी कार्यवाही झाल्यास, तपासणीचा अहवाल येण्यास किमान सात दिवस लागत असत. आता फिरत्या प्रयोगशाळेत भेसळ तपासणीचा अहवाल अर्ध्या तासातच मिळणार असल्याने त्यावर कारवाई करणे तसेच भेसळ रोखणे सुलभ होणार आहे, अशी माहितीही यावेळी मंत्री श्री. रावल यांनी दिली.

फिरत्या प्रयोगशाळेत होणार खालील तपासण्या

  • दुधातील भेसळ.
  • चहा पावडरमध्ये होणारी रंगांची भेसळ.
  • चटणी सदृश मसाले पदार्थात होणारी रंगांची भेसळ.
  • मधात होणारी भेसळ.
  • साखरेत होणारी भेसळ.
  • अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासणी.
  • फळांची गुणवत्ता तपासणी.
  • फळांचे रासायनिकीकरण ओळखणे.

अन्न भेसळ रोखण्यासाठी काही तक्रार असल्यास नागरीकांनी 1800 222 365 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी अन्न औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले.

English Summary: Launch of the first 'Mobile Food Testing Lab' in Maharashtra Published on: 04 July 2019, 09:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters