भारत एक कृषिप्रधान देश आहे त्या अनुषंगाने देशातील सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवित असते. राज्य सरकार देखील महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते तसेच अनेक कल्याणकारी योजना शासनदरबारी विचाराधीन असतात. मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील गरजू शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणारे हे कर्ज बिनव्याजी असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक साहाय्य होत असते.
शासनाद्वारे तीन लाख रुपयांचे कर्ज दिले जाते ही खरच कौतुकास्पद गोष्ट आहे, मात्र याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यातच शेतकरी राजांचे कंबरडे मोडले जाते, तीन लाख रुपयांची बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी शेतकरी राजांना तीन जोड चपलांचे घासावे लागतात तत्पश्चात राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख रुपये मिळत असतील. मात्र राज्यातील लातूर जिल्हा बँकेचा शेतकरी हिताचा पॅटर्न हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून लातूर जिल्हा बँक तीन लाख नव्हे तर तब्बल पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकर्यांना पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. सध्या लातूर मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयाने मूर्त रूप घेण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांना या कर्जाव्यतिरिक्त एक हेक्टर ऊस लागवड करण्यासाठी एक लाख 60 हजार रुपयांचे कर्ज देखील बँकेद्वारे देण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँकेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे सांगितले जात आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतील परिणामी जिल्ह्याच्या ऊस उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यावर्षी मुबलक पाणी साठा असल्याने आणि बँकेच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शेतकर्यांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय आता मूर्त रूप घेत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
पैशांअभावी अनेक शेतकरी अजूनही आधुनिकतेची कास धरू शकत नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र आता लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाच लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले जातं आहे. जिल्हा बँकेच्या विविध शाखेत आतापर्यंत 61 लाख रुपयांचे या निर्णया अंतर्गत कर्ज वितरित झाल्याचे समजत आहे. एकंदरीत जिल्हा बँकेचा हा निर्णय कौतुकास्पद असून या निर्णयासारखाच निर्णय राज्यातील दुसऱ्या बँकेने देखील घेणे आवश्यक आहे.
Share your comments