जर आपण कापूस लागवडीचा विचार केला तर विदर्भ, खानदेश मधील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील प्रामुख्याने मालेगाव, येवला आणि नांदगाव आणि सटाणा तालुक्याचा काही भागातून कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
सध्या नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये मागील हंगामाचा विचार केला तर 34 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त कपाशीची लागवड करण्यात आली होती व या वर्षी कपाशीचे भाव चांगले असल्याने या हंगामात देखील कपाशीचे भाव चांगले राहतील या अपेक्षेने लागवड क्षेत्रामध्ये दहा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:लोडशेडिंगबाबत अजित पवारांची मोठी घोषणा! लोडशेडिंगवर तोडगा निघण्याची शक्यता...
या सर्व पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात प्रत्येक कापूस उत्पादक गावामध्ये फरदड मुक्त गाव ही संकल्पना कृषी विभागाद्वारे राबविण्यात येत आहे. यामध्ये बियाणे उत्पादक कंपन्या, कापूस उत्पादनाशी निगडित असलेल्या सर्व यंत्रणा, कीटकनाशक कंपनी, कापूस खरेदी केंद्रे तसेच जिनिंग व प्रेसिंग मिल यांच्या सहभागाने फरदड निर्मूलन मोहीम राबविण्यात यावी असे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. यामध्ये नमूद केले आहे की, मागच्या वर्षी लांबलेला पाऊस व अधिक उत्पादनासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस पीक जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शेतात ठेवलेले होते.
लांबलेला कापूस हंगाम व कापूस पीक शेतात राहिल्यामुळे कपाशीला अपायकारक किडीचा जीवनक्रम अखंडित राहण्याची शक्यता असल्यामुळे चालू खरीप हंगामात प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. पुढे कपाशीवरील सर्वात नुकसानदायक कीड म्हणजे गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे व चालूवर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात जमिनीची खोल नांगरट करून कापूस पिकाची मे महिन्यात होणारी पूर्वहंगामी लागवड टाळावी. तसेच गुलाबी बोंड आळी चे जीवन चक्र खंडित व्हावे यासाठी शेत पाच ते सहा महिने कापुसविरहित ठेवल्यानंतर डिसेंबर महिन्यानंतर खाद्य न मिळाल्याने बोंड आळी सुप्तावस्थेत जाते. परंतु जर शेतकऱ्यांनी फरदड ठेवली तर या किडीचे जीवनचक्र अखंडित चालू राहण्यास मदत होते व पुढील हंगामामध्ये देखील बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे, कपाशीच्या काड्या म्हणजेच पऱ्हाट्या शेताच्या बांधावर ठेवू नये, शेत व शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. पराठ्या या थ्रेडरद्वारे जमिनीत गाडावे अथवा जाळून टाकाव्यात. तसेच कपाशीचे पीक आवरल्यानंतर हंगामाच्या अगदी शेवटी शेतात शेळ्या व मेंढ्या तसेच इतर जनावरे चारण्यासाठी सोडावीत, त्याचप्रमाणे गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरित वाणांची लागवड न करता एकाच वाणाची एकाच वेळी लागवड करण्यात यावी असेही उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
जर मागच्या वर्षीचा विचार केला तर कृषी विभाग व खाजगी संस्था, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, जिनिंग प्रेसिंग मिल, बियाणे विक्रेते व बियाणे कंपनीच्या सहकार्याने गुलाबी बोंड आळी प्रादुर्भाव नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. त्यामुळेच या गावांमध्ये कापूस उत्पादन होते अशा गावात फरदड मुक्त गाव संकल्पना साधण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.( स्त्रोत-शेतशिवार)
Share your comments