मागील वर्षीचे सोयाबीन अनुदान तात्काळ वितरित करण्यासाठी आदेश : पणनमंत्री सुभाष देशमुख

Thursday, 02 August 2018 08:30 AM

गतवर्षीचे सोयाबीन अनुदान तात्काळ वितरित करण्यासाठी खासगी बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची माहिती तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. कोणताही सोयाबीन उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.

हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानाबाबत श्री. देशमुख यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी  वरील निर्देश दिले. बैठकीस आमदार राजेंद्र पाटणी, आमदार तानाजी मुटकुळे, पणन विभागाचे उपसचिव के. जी. वळवी, पणन उपसंचालक ज्योती शंखपाल यांच्यासह हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील खासगी बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पणनमंत्र्यांना माहिती देण्यात आली की, गतवर्षी पणन विभागाच्या अखत्यारितील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत खरेदी केलेल्या सोयाबीनचे अनुदान शासनाने वितरित केले होते. या बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची आवश्यक माहिती ऑनलाईन पद्धतीने भरल्यामुळे अनुदान वितरित करण्यात आले. मात्र खासगी बाजार समित्यांनी ही माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली नसल्यामुळे अनुदान वितरित  करता आले नाही.

खासगी बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची माहिती तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. पणन संचालकांनी प्राप्त होणारी माहिती शासनाकडे पाठविल्यानंतर तात्काळ त्या अनुषंगाने आवश्यक अनुदानाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती किंवा आवश्यकता पडल्यास मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळेल यादृष्टीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही पणनमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिली.

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.