महाराष्ट्रात केळी पीक प्रामुख्याने जळगाव,धुळे, नंदुरबार,अहमदनगर, सांगली तसेच सातारा या जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जाते. केळी उत्पादनाच्या बाबतीत जळगाव जिल्हा अग्रेसर आहे. जळगाव जिल्ह्यात 45 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीचे पीक घेतले जाते. परंतु या केळी उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या जळगाव जिल्ह्यात सन 2008 पासून कुकुंबर मॉसेकया वायरस ने थैमान घातले आहे आणि त्यानंतर दरवर्षी त्याचा प्रादुर्भाव हा वाढतच जात आहे.
गेल्या वर्षी या रोग आणि जळगाव जिल्ह्यात अक्षरश थैमान घातले होते. प्रामुख्याने रावेर, चोपडा, मुक्ताईनगर आणि रावेर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. या लेखात आपण या रोगाविषयी तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत.
या रोगास कोणते घटक कारणीभूत असतात?
पावसाळ्यात सतत असणारे ढगाळ वातावरण आणि जून व जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडित पाऊस,तसेच हवेचे कमी तापमान व वाढलेली आर्द्रता हे घटक या रोगास अतिशय पोषक असतात.
या रोगाला जर आटोक्यात आणायचे असेल तर प्रथमावस्थेत त्याची ओळख होणे फार महत्वाचे असते. या रोगाच्या प्रसाराचे प्राथमिक महत्त्वाचे कारण म्हणजे याचा प्रसार रोगट कंदापासून होतो. तसेच दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मावा या किडी मार्फत देखील त्याचा प्रसार वेगात होतो. तसेच एकापाठोपाठ एक पीक घेतले जातात.दोन पिकांमध्ये दोन ते तीन महिन्यांचा विश्रांती कालावधी असावा.तसेच पीक फेरपालट करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या विषाणूचे अनेक यजमान पिके आहेत जसे की, गाजर गवत, छोटा केणा, शेंदाड, काकडी, दुधी भोपळा,गिलकेकारली, वांगी इत्यादी पिकांचा समावेश होतो.
या रोगाची लक्षणे कोणती आहेत?
केळीची लागवड केल्यानंतर प्रामुख्याने दोन अथवा तीन महिन्यात या रोगाचे लक्षणे पिकावर दिसू लागतात. या रोगाच्या सुरुवातीस केळी पिकाच्या कोळसुर पानांवर हरितद्रव्य विरहित पिवळसर पट्टे दिसतात. सुरुवातीला ही पट्टी तुटक-तुटक किंवा संपूर्ण पानावर आढळून येतात. कालांतराने पानाचा पृष्ठभाग हा आकसला जातो. तसेच पानाच्या कडा वाकड्या होऊन आकार लहान होतो. तसेच नवीन येणारे पानेदेखील आकाराने लहान होतात. पानाच्या शिरा ताठ होऊन संपूर्ण पान कडकहोते तसेच पानांच्या शिरा यांतील भाग काळपट पडून तेथील ऊती मरतात व पाने फाटतात. तसेच जेव्हा रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो तेव्हा केळीच्या पोंग्याजवळील भाग पिवळा पडून पोंगासडतो. झाडांची वाढ खुंटते व झाडांची निसवन उशिरा व अनियमित होऊन फण्या लहान होतात व फळे विकृत आकाराची होतातव फळांवर पिवळ्या किंवा काळ्या रंगाच्या रेषा दिसतात.
या रोगाचे नियंत्रण कसे करावे?
ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर कुठलाही प्रकारचा ठोस उपाय करता येत नाही.एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असते. या रोगाचा प्रादुर्भाव काही झाडांवर दिसल्यास अशी प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उखडून दूर ठिकाणी जाळून किंवा गाढून टाकावी. बागेच्या अवतीभवती असलेली तणे उपटून बाग स्वच्छ ठेवावा. तसेच वर उल्लेखलेल्या यजमान पिकांची लागवड बागेच्या अवतीभवती करू नये. मावा या किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट 30 ई.सी. 20 मिली किंवा थायोमेथाक्झाम 25 डब्ल्यू. जी. दोन ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल. पाच मिली या कीटकनाशकाची दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून बाग पूर्णपणे स्वच्छ करून फवारणी करावी. या विषाणूजन्य रोगांचे प्रमाण दरवर्षी वाढत असून केळी उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करणे व केळी पिकावरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण करून नुकसान टाळणे गरजेचे आहे. असे अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प,केळी संशोधन केंद्र, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
साभार- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज
Share your comments