दिवाळीला संपूर्ण भारतात वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश निर्माण व्हावा, या उद्देशाने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा सण आनंद आणि समृद्धी आणणारा सण मानला जातो. या दिवशी राम वनवासातून घरी परतले होते त्यामुळे दिवाळीला दिवे लावून आनंद साजरा केला जातो. तर वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी माता लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णूशी झाला होता.
भारतीय संस्कृतीत दिवाळी आणि दिवाळीतील धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, मोठी दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज या पाच दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक दिवस. या दिवशी लक्ष्मी-गणेश, कुबेर आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. या दिवशी केरसुणी, बत्ताशे, पैसे, धान्य, कलश, इत्यादी गोष्टींनाही विशेष महत्व आहे.
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी वैशिष्टयपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची आराधना करून आपल्यावर तिचा कृपा आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते.यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त दुपारी 1:42 ते 2:48 पर्यंत आणि संध्याकाळी 5.55 ते 8:28 पर्यंत आहे . दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे. यावेळी देवाला आणि धनाला धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो.
Share your comments