1. बातम्या

शेतकऱ्यांना साखळी पुरवठा आणि मालवाहतूक करण्यासाठी किसान सभा मोबाईल एप

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
1 मे 2020 कोविड-19 महामारीच्या या काळात शेतकरी आपला माल बाजारात पाठवण्यासाठी तसेच बियाणे खते मिळवण्यासाठी मदतीची प्रतिक्षा करत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांचा माल वेळेवर उचित किंमतीत बाजारात उपलब्ध होण्याची गरज आहे.

सेंट्रल रोड रीसर्च इन्स्टिट्यूट सीएसआयआर (CSIR-CRRI) या नवी दिल्ली येथील संस्थेने शेतकऱ्यांना साखळी पुरवठा आणि मालवाहतूक व्यवस्थेशी जोडण्यासाठी किसान सभा अॅप सुरू केले असून त्याचे उद्घाटन डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, व्यवस्थापकीय संचालक आयसीएआर आणि सचिव डीएआरई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहपात्रा यांनी सीएसआयआरने अशाप्रकारे शेतकरी, वाहतूकदार यांच्या सह कृषी उद्योगातल्या सर्व घटकांना एकाच ठिकाणी जोडणारे अॅप विकसित केल्याबद्दल सीएसआयआरचे अभिनंदन केले आणि आयसीएआर आणि सीएसआयआर यांनी एकत्र काम करून कृषी विज्ञान केंद्रांचे नेटवर्क या कामासाठी वापरावे, अशी सूचना केली.

या नव्या अॅपमुळे सध्याच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सीएसआयआर कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार सीएसआयआरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सचिव डॉ. शेखर मांडे यांनी यावेळी केला. उद्योग, एमएसएमई, वाहतूकदार आणि गुंतवणूकदार यांनीही आयसीएआर सोबत पुढे यावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या अॅपच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजकांचे प्रतिनिधी, शेतकरी, सीएसआयआर-सीआरआरआयचे प्रतिनिधी आणि काही वरीष्ठ वैज्ञानिक उपस्थित होते. सीएसआयआर - सीआरआरआयचे संचालक डॉ. सतीश चंद्र म्हणाले, की कृषी बाजार हे संघटित नसतात त्यामुळे बराचसा कृषीमाल फुकट जातो अथवा कमी किमतीत विकला जातो, म्हणून किसान सभा अॅप विकसित करण्यापूर्वी आशियातील सर्वात मोठी मंडई असलेल्या आजादपूर मंडईतल्या सुमारे 500 हून अधिक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन, 6 दिवस व्यापाऱ्यांचे, वाहतूकदारांचे सर्वेक्षण करून, त्यांच्या वेगवेगळ्या गरजांचा तपशीलवार प्राथमिक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा आणि सध्याच्या काळाचा विचार करून हे अॅप विकसित करण्यात आले आहे.

  • हे पोर्टल शेतकरी, वाहतूकदार, सेवापुरवठादार (खते, बी बियाणे यांचे विक्रेते, शीतगृहे, गोदाम मालक, मंडईतले विक्रेते) तसेच ग्राहक (किरकोळ विक्रेते, ऑनलाईन दुकाने, संस्थात्मक ग्राहक) यांना वेळेवर आणि प्रत्यक्ष जोडते.
  • ह्या पोर्टल मधे सर्व प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळण्यासाठी होतो तसेच मंडई विक्रेत्यांना एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांशी जोडते.
  • किसान सभा अॅप मुळे कृषी उद्योगातल्या खते, बी-बियाणे विक्रेत्यांनाही जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचता येते.
  • शीतगृहे, गोदाम मालक आणि ज्या ग्राहकांना शेतकऱ्यांकडून थेट माल विकत घ्यायचा आहे, त्यांनाही उपयुक्त.
  • किसान सभा अॅप कृषी उद्योगातल्या शेतकरी, मंडई विक्रेते, वाहतूकदार, मंडई मंडळ सदस्य, सेवा पुरवठादार आणि ग्राहक या 6 महत्त्वाच्या घटकांना जोडते.

किसान सभा अॅप शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात आणि वेळेत मध्यस्थांखेरीज संस्थात्मक ग्राहकांपर्यंत मालाची खरेदी विक्री करण्यासाठी आधारभूत ठरणार असून त्यांचा नफा वाढेल. त्याचप्रमाणे चांगली मागणी असणाऱ्या बाजारपेठा जोडणे, माल पोचवण्यासाठी स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध होऊन पर्यायाने शेतकऱ्यांचा नफा वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters