शेतकऱ्यांच्या मालाची जलद वाहतूक करण्यासाठी केंद्रीय कृषी व रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक व वातानुकूलित किसान रेल्वेची सुरुवात केली होती. ही रेल्वे अगोदर दानापूरपर्यंतच जात होती, मात्र शेतकऱ्यांनी मागणी केल्याने किसान रेल आता आजपासून ( 14 ऑगस्ट) दानापूर पर्यंत न जाता तिचा पल्ला वाढला असून तो मुजफ्फरपुरपर्यंत करण्यात आला आहे. या बदलासह किसान रेल्वेच्या वेळातही बदल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात मुख्यत्वेकरून द्राक्ष, डाळिंब, कांदे केळी तसेच भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन होते. देशाच्या इतर भागात हा पिकवलेला माल या रेल्वेच्या माध्यमातून पोहोचवून शेतकऱ्यांच्या आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टीने केंद्रीय कृषी मंत्रालय व रेल्वे मंत्रालय यांनी किसान रेल सुरू केली आहे. अगोदर किसान रेल देवळाली रेल्वे स्थानक ते दानापूर रेल्वे स्थानकापर्यंत सुरू करण्यात आली होती. परंतु आता 14 ऑगस्ट पासून तिचा पल्ला वाढवून तो आता मुजफ्फरपुरपर्यंत करण्यात आला आहे. आता ती नवीन वेळापत्रकानुसार शुक्रवार सायंकाळी म्हणजे आज सायंकाळी सहा वाजता देवळाली स्थानकातून निघेल आणि रविवारी पहाटे 3 वाजून 55 मिनिटांनी मुजफ्फरपुरला पोहोचेल. तसेच ती मुजफ्फरपुर स्थानकातून रविवारी सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांनी देवळालीकडे प्रस्थान करेल त्यानंतर ती सोमवारी सायंकाळी सात वाजून 45 मिनिटांनी देवळाली स्थानकात पोहोचेल. अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
ज्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल या किसान रेलच्या मार्फत पाठवायचा आहे, त्यांनी नोंदणीसाठी शेतीमालाची पॅकिंग करून तो गावाजवळच्या रेल्वेच्या पार्सल ऑफिस मध्ये आणावा, शेतकऱ्यांना त्यासोबत आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागणार आहे, अशी माहिती रेल्वेस्थानक वाणिज्य प्रबंधक कुंदन महापात्रा यांनी दिली.
Share your comments