Mumbai News: ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. बाबामहाराज सातारकर यांच्या घरातच वारीची परंपरा होती. त्याचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला.त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि विठ्ठलभक्तांवर शोककळा पसरली आहे.
बाबा महाराजांची रसाळ वाणी, निरूपणाची आगळी शैली कर्णमधुर होती. त्यांनी कीर्तन- निरूपण आणि भजन सातासमुद्रापार पोहचवले. बाबा महाराज यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारा आधारवड अशा स्वरूपाचा विठ्ठल भक्त चिरशांत झाला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्राची विठ्ठल, ज्ञानेश्वर भक्तीची परंपरा, वारकरी सांप्रदायाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. साध्या, सोप्या, रसाळ, ओघवत्या वाणीतल्या कीर्तनांनी महाराष्ट्राचे प्रबोधन केले. प्रबोधनाच्या चळवळीतून अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेसारख्या कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या किर्तनांनी व्यसनमुक्तीच्या लढ्याला बळ दिले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात बाबा महाराजांचे स्वतंत्र स्थान होते. त्यांचे निधन महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी आहे. बाबा महाराजांच्या कुटुंबियांच्या, अनुयायांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Share your comments