गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे तालिबानने कब्जा केल्यामुळे देशातील अनेक नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. देशात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे सध्या देशात दोन वेळच्या अन्नासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे, यासाठी किडनी आणि मुलं विकावी लागत आहेत. देशातील अर्ध्याहून अधिक लोक उपासमारीच्या मार्गावर आहेत. कडाक्याच्या थंडीत भुकेने झगडणाऱ्या लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, तेव्हापासून याठिकाणी अशीच परिस्थिती आहे, पाण्यासाठी देखील वणवण फिरावे लागत आहे, तर महिलांवर अत्याचार सुरु आहे. यामुळे रोज धक्कादायक घटना घडत आहेत.
तालिबान सत्तेवर आल्यापासून लोकांची अवस्था बिकट झाली आहे. एक वेळची भाकरी मिळवण्यासाठी लोक शरीराच्या अवयवांचा व्यापार करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लोकांना जगणे अवघड झाले आहे. अनेकजण देश सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यामध्ये सगळेच यशस्वी होत नाहीत. अफगाणिस्तानमधील शहार-ए-सेबज भागात हजारो अफगाणी लोक कसे तरी आपले जीवन जगत आहेत. तालिबान आणि मागील सरकारमधील संघर्ष आणि गेल्या ४ वर्षांच्या दुष्काळामुळे त्यांना त्यांची स्वतः ची घरे सोडावी लागली आहेत. मात्र देश सोडण्यात अनेक अडचणी येत आहेत.
या भागात साधी वीज आणि पाणी देखील नाही. थंडीपासून वाचण्यासाठी या घरांमध्ये कोणताही उपाय नाही. सध्या थंडीची परिस्थिती बिकट होत असताना बहुतांश घरांमध्ये स्टोव्हही नाही. ज्यांच्याकडे चुली आहेत, ते घर गरम करण्यासाठी लाकूड आणि कोळशाऐवजी प्लास्टिक जाळतात. त्यामुळे विषारी धूर पसरून अनेकांना वेगवेगळे आजार होत आहेत. यामुळे आरोग्याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी कोणालाही कोणतेही काम नाही. यामुळे मोठे हाल सुरु आहेत. अनेकजण भीक मागून आणि मिळेल ते खराब अन्न खाऊन जगत आहेत. जरी काम मिळले तरी ५० रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळत नाहीत.
येथील एक व्यक्तीने सांगितले की, मी दिवसभर फक्त चहा पितो आणि कोरडी भाकरी खातो. माझ्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीत. मी माझी एक किडनी दीड लाख अफगाणीमध्ये विकण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, माझी किडनी काढली गेली तर मी मरेन. पण तरीही मला माझी किडनी विकायची आहे. मी माझे एक मूल १५०,००० अफगाणींना विकायला तयार आहे. याद्वारे मी माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना वाचवू शकतो, यामुळे येथील परिस्थितीचा आपल्याला अंदाज येईल.
Share your comments