1. बातम्या

योग्य व्यवस्थापन ठेवा अन् खरीप हंगामात घ्या ज्वारीचं भरघोस उत्पन्न

आपला देश कृषी प्रधान आहे, काळ्या आईच्या कुशीतून बळीराजा नव-नवीन पिके घेत असतो. या धान्यांच्या पिकातून तो सर्व जनतेची भूक भागवत असतो. शेतात विविध प्रकारची पिके घेतली जातात. आज आपण ज्वारी या पिकाविषयी माहिती घेणार आहोत.

KJ Staff
KJ Staff

 

आपला देश कृषी प्रधान आहे, काळ्या आईच्या कुशीतून बळीराजा नव-नवीन पिके घेत असतो.  घेतलेल्या उत्पन्नातून  तो सर्व जनतेची भूक भागवत असतो.  शेतात विविध प्रकारची पिके घेतली जातात.   आज आपण ज्वारी या पिकाविषयी माहिती घेणार आहोत.  महाराष्ट्रात ज्वारी हे सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अन्नधान्याचे प्रमुख पीक मानले जाते.  तसेच जनावरांच्या चार्‍यातील महत्त्वाचा अन्नघटक म्हणून यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पूर्व खानदेश आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांत हे पीक सर्वसाधारणपणे घेण्यात येते. भारतातील बहुतेक भागात ज्वारी हे प्रमुख अन्नधान्य पीक म्हणून लागवड करतात.  ज्वारीचे  पिक खरीप तसेच रब्बी या दोन्ही हंगामात घेता येते. पण रब्बी ज्वारीच्या तुलनेत खरीप ज्वारीचे उत्पादन जास्त होत असते.

 भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरात या राज्यांमध्ये ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.  या पिकासाठी आपण कशाप्रकारची मशागत करावी, जमीन कशी असावी याची माहिती घेणार आहोत.  पाण्याचा चांगला निचरा असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत हे पीक चांगले येते.  जमिनीचा सामू ५.६ ते ८.५ असेल तर पीक घेता येते. 

जिवाणू खताची बीजप्रक्रिया

ज्वारीच्या अझोटोबक्टर जिवाणूसंवर्धक व स्पुरद विद्राव्य जिवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास लावावे बुरशीच्या नियंत्रणासाठी ४० ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.

ज्वारीच्या बियांणामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार आपण जाणून घेऊ..

जाती -

  •  संकरित वाण- सी.
  • एच. एस. ५ ,
  • सी.एच. एस. ९,
  • सी.एच.एस. १४,   
  • सी. एच. एस. १६ ,
  • सी. एच एस १७ ,
  • सी एच एस १८,
  • सी एच एस २१,  
  • सी एच एस २३,
  • सी एच एस  २५  
  • सी एच एस  ३५

पेरणीची वेळ

सध्या खरीप हंगाम सुरु होणार आहे. यात हवामान विभागाने शेतकरी बांधवाना आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे यंदा मॉन्सून चांगला असणार आहे. ज्वारीची पेरणी मॉन्सूनच्या ऐन मोसमात होत असते. ज्वारीची पेरणी योग्य वेळेत झाल्यास चांगले उत्पादन येते. ज्वारीची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव जाणवतो.

रासायनिक खतांचे व्यवस्थापन

चांगल्या उत्पादनासाठी खरीप ज्वारीला १०० किलो नत्र ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश आवश्यक असते. त्यातील अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे, राहिलेल्या नत्राची मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावा.

 आंतर मशागत

तण नियंत्रण

 खुरपणी व कोळपणी तणांचा प्रादुर्भाव बघून पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस होईपर्यंत करावी. ऍट्राझीन  या तण नाशकाची फवारणी ०.५  कि. ग्रॅ प्रति हेक्‍टर ६५० लिटर पाण्यात बियाणे उगवण्यापूर्वी जमिनीवर करावी.

   पीक संरक्षण

अ ) कीड नियंत्रण : ज्वारी पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, खोडकिडा, मावा व तुडतुडे आदी कीटक आढळून येतात.

 खोडमाशी व खोडकिडी ज्वारी पिकासाठी अधिक नुकसानकारक ठरू शकतात.

खोडमाशी : ज्वारी पिकावर सर्वात आधी म्हणजे पेरणीनंतर एक आठवड्यातच आढळून येते. खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकात  पोंगे मर होते.  खोडमाशी नियंत्रणाचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे पेरणी लवकर (२५ जून ते ७ जुलै) करावी. खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्विनॉलफॉस २५ मिली १० लिटर पाण्यात घेऊन पहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर दहा दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

खोडकिडी : खोडकिडीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर साधारण २५ ते ३० दिवसांनी दिसून येतो.  या किडीमुळे पानावर ओळीने छिद्रे  दिसतात व पोंगे सुकतात. खोडकिडी नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस १५ मिली १० लिटर पाण्यातून पीक उगवल्यानंतर ३० दिवसांनी करावी व दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.

 मावा व तुडतुडे : मावा व तुडतुडे नियंत्रणासाठी २० ग्रॅम कार्बारिल ५० टक्के ही भुकटी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  ब)  रोग नियंत्रण

  दाण्यावरील बुरशी: या रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (०.१ टक्के)+ थायरम ( ०.२ टक्के) फवारणी पीक फुलोऱ्यात आल्यानंतर करावी. पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

 करपा: रोगाचा प्रादुर्भाव झाला तर ज्वारीचे पान करपतात व नंतर जळतात. त्यामुळे प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत बाधा येऊन उत्पादन कमी होते.  करपा नियंत्रण करण्यासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे.

काणी: रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया करताना ४ ग्रॅम गंधकाची भुकटी प्रत्येकी एक किलो बियाण्यास चोळावे.

 

महेश देवानंद गडाख

maheshgadakh@gmail.com

सोज्वळ शालिकराम शिंदे,  विठ्ठल देवानंद गडाख 

English Summary: kharif jawar cultivation Management important to get more production Published on: 20 April 2020, 03:52 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters