भारतात कपाशी लागवड लक्षणीय बघायला मिळते, राज्यात देखील कपाशीचे क्षेत्र चांगले उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांतात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जळगाव जिल्ह्यातील कपाशीचे क्षेत्र हे विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी, कापसातुन अधिक उत्पादन प्राप्त करण्याच्या हेतूने फरदड उत्पादन घेतात, पण यातून उत्पादनात वाढ होण्यापेक्षा उत्पन्नात घट होताना दिसत आहे. कपाशीचे फरदड घेतल्याने जमिन नापीक बनत चालली आहे. त्यामुळे येत्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकाच्या उत्पादनात कमालीची घट होते.असे असले तरी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र कपाशीचे फरदड उत्पादन घेणे काही सोडले नाही.
कपाशी फरदड टाळावी यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना सूचना केल्या होत्या, मात्र या सूचनाना न जुमानता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड उत्पादन घेण्याचा आगाऊपणा केला. मात्र आता खांदेशातील कापुस उत्पादक शेतकरी शहाणा झाल्याचे चित्र दिसत आहे. खानदेशातील शेतकऱ्यांनी आता कापूस फरदड उत्पादन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कापसाचे फरदड घेत होते ते अधिक उत्पादणासाठी मात्र व्हायचे उलट, उत्पादन न वाढता यावर बोंड आळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. म्हणून आता खानदेशातील सुजान शेतकरी, फरदड उत्पादन न घेता आता बाजरी गव्हासारख्या पिकांकडे वळताना दिसत आहेत.
खानदेश क्षेत्रात नऊ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड बघायला मिळते. खानदेशात यावेळी अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे फरदड उत्पादन घेण्याचे ठरवले, त्या अनुषंगाने नोव्हेंबर नंतरही शेतकऱ्यांनी कपाशीचे पिक जसेच तसे वावरातच उभे राहू दिले. शेतकऱ्यांचा हा एवढा आटापिटा फक्त उत्पादनवाढीसाठी चालू होता, मात्र त्यातून उत्पादन वाढण्याऐवजी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसू लागला शिवाय यामुळे जमीन नापीक बनू लागली. कृषी अधिकाऱ्यांनी कापूस फरदड घेऊ नका असे शेतकऱ्यांना वारंवार आवाहन केले, मात्र शेतकऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. शेवटी नुकसान स्वतःच्या डोळ्याने बघितल्यानंतर फरदड उत्पादन टाळण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला.
राज्यात तसेच खानदेश प्रांतात या वर्षी रब्बी हंगामासाठी चांगले पोषक वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. गव्हाच्या लागवडीसाठी यंदा चांगले वातावरण असल्याचे जाणकार लोक देखील आपले मत व्यक्त करत आहेत. शिवाय खानदेशात यावर्षी मुबलक प्रमाणात रब्बी हंगामासाठी पाणी असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकातून चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. उशिरा का होईना शेतकऱ्यांनी फरदड न घेण्याचा एक चांगला निर्णय घेतला यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल आणि जमिनीचा पोत देखील सुधारेल.
Share your comments