
Karjat and Jamkhed News
मुंबई : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठीचा प्रस्ताव संचालक (पणन) यांनी शासनास सादर करावा. तसेच जामखेड येथे शेतकरी भवनाच्या बांधकाम परवानगी मागणीचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सादर केला आहे. या प्रस्तावास संचालक (पणन) यांनी तातडीने मान्यता द्यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.
कर्जत व जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित विषयांबाबत आढावा बैठक महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे झाली. यावेळी सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सह सचिव वि.ल. लहाने, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी तसेच पणन विभागाचे संचालक श्री.रसाळ व उपसंचालक श्री.निंबाळकर (दूरदृष्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.
जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी २२ एप्रिल २०२५ रोजी शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिलेली आहे. हे शेतकरी भवन उभारण्यासाठी शासन अनुदान ५० टक्क्याच्या मर्यादेत दिले जाणार असून उर्वरित ५० टक्के निधी बाजार समितीने स्वनिधी अथवा कर्जातून उपलब्ध करुन घ्यायचा आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार असून डिसेंबर 2023 मध्ये याबाबत शासनाने निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कर्जत येथे शेतकरी भवन उभारण्यासाठी तसेच बाजार समितीकडून नियमानुसार सादर होणाऱ्या अन्य बाबींवरील प्रस्तावास देखील तातडीने मान्यता दिली जावी, अशा सूचना सभापती प्रा. शिंदे यांनी दिल्या आहेत.
Share your comments