Pune News : अंबिका मसाला उद्योजक कमलताई परदेशी यांचं निधन झालं आहे. परदेशी यांना ब्लड कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कमल परदेशी या स्वत: निरक्षर होत्या. तरीही त्यांनी स्वत:च्या जिद्दीवर अंबिका मसाल्याची निर्मिती केली. या उद्योग समूहाच्या माध्यमातून त्या घराघरात पोहचल्या. शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाल्याच्या चेअरमन असा त्यांच्या प्रवास आहे. मात्र आता त्यांच्या निधनाने उद्योग समूहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव गावात कमल परदेशी यांनी बचत गटातील महिलांना एकत्रित करून अंबिका मसाला ब्रँड तयार केला. हा मसाला कमी काळात सर्वांच्या पसंदीस आला आणि त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. छोट्याशा खेडेगावातून मसाला कंपनी सुरू करून शेकडो महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. यामुळे त्यांचे परदेशी मान्यवर, लोकप्रतिनीधी आणि राज्य सरकारकडून कौतुक करण्यात आले आहे.
कमलताई परदेशी यांनी २००० साली खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशातून मसाला व्यवसाय सुरू केला. कमलताईंनी मसाल्याच्या व्यवसायाची सुरुवात आपल्या झोपडीतूनच सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या मसाल्याला नागरिकांकडून चांगली पसंदी मिळाली.
दरम्यान, कमलताई परदेशी यांनी सुरुवातीला पुण्यातील सरकारी कार्यालयाबाहेर मसाले विकण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बिग बझारने त्यांच्या मसाल्याला त्यांच्या स्टोअरमध्ये स्थान दिले. यामुळे अंबिका मसाला प्रत्येक नागरिकांच्या घरात पोहचला. यामुळे आदर्श उद्योजिका म्हणून कमलताई परदेशी यांच्याकडे पाहिले जावू लागले होते. तसंच अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. जर्मनीत देखील त्यांच्या मसाल्याचा डंका वाजला आहे.
Share your comments