1. बातम्या

Kalingad Cultivation : कलिंगड आणि खरबुज सुधारित लागवड तंत्रज्ञान

खरबूजाचा गर फिकट पिवळसर तांबूस किंवा फिकट हिरवा असतो. कलिंगडा प्रमाणेच बिया संबंध गरात पसरलेल्या असून त्या मध्यभागीच असतात. यामध्ये चुना फॉस्फरस ही खनिजे तसेच अ, ब आणि क जीवनसत्वे आढळतात गर सारक असल्याने बुद्धकोष्ठतेवर फारच उपयुक्त आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Kalingad Cultivation

Kalingad Cultivation

ऐश्वर्या राठोड, डॉ.आदिनाथ ताकटे

कलिंगड आणि खरबुज हे गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांचे आवडते व परवडणारे फळ आहे. रखरखत्या कडक उन्हाळ्यात तहानतेने हैराण झालेल्या प्रवाशांना त्यांचा थंडगार गोड आणि स्वादिष्ट गर म्हणजे निसर्गाने बहाल केलेली देणगीच आहे. कमी क्षेत्रात, कमी श्रमात, कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन आणि फळाचा टिकाऊपणा ह्या गुणवैशिष्ट्येमुळेच तसेच उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या मागणीमुळे शेतकरी या पिकाकडे व्यापारीदृष्ट्या पाहु लागला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कलिंगडांची आणि खरबुजाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली पाहिजे.

पोषकद्रव्ये व आहारातील महत्त्व
कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण पाणी ९६ %, शर्करा पदार्थ ३.३ %, साखरेचे प्रमाण ९-१२ %, प्रथिने ०.२ %, फॅटस ०.२ %, तंतुमय पदार्थ ०.२ %, खनिजे ०.३ %, कार्बोहायड्रेडस ३.३ %, कॅलरी उष्मांक १६ %, चुना ०.०१ %, स्फुरद ०.०९ %, लोह ०.००८ %, जीवनसत्त्व-२३५ आय यू (‘क’-०.००१ मि. ग्रॅ., ‘ब’-१२ मि. ग्रॅ., ‘ई’-१ मि. ग्रॅ.) तसेच लायकोपीन व अॅन्थेसायानिन यांचे प्रमाण फळामध्ये जास्त असते.

खरबूजाचा गर फिकट पिवळसर तांबूस किंवा फिकट हिरवा असतो. कलिंगडा प्रमाणेच बिया संबंध गरात पसरलेल्या असून त्या मध्यभागीच असतात. यामध्ये चुना फॉस्फरस ही खनिजे तसेच अ, ब आणि क जीवनसत्वे आढळतात गर सारक असल्याने बुद्धकोष्ठतेवर फारच उपयुक्त आहे.
जमीन
•रेताड मध्यम काळी पोयट्याची किंवा गाळाची आणि चांगला निचरा होणारी जमिनीत यांची वाढ चांगली होते. जमिनीची सामू विमलता ६.५ ते ७.० दरम्यान असावा.
•भारी जमिनीत लागवड केल्यास वेलींची वाढ जास्त होते आणि जमीन आणि पाणी यांचा समतोलपणा न ठेवल्यास फळांना भेगा पडतात.
•करल, चिबड, चोपण जमिनीत लागवड करू नये. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणाऱ्या सोडियम, कॅल्शियम कार्बोनेट व बायकार्बोनेट, मॅग्रशियम सल्फेट, क्लोराईड, सारख्या विद्राव्य क्षारांमुळे फळावर डाग पडण्याची शक्यता असते.
•नविन लागवड केलेल्या फळबागातील रिकाम्या भागात या फळांची लागवड फायदेशीर ठरते.
•जमिनीची निवड करताना शक्यतो आधीच्या वर्षी भोपळ्यासारखी वेलवर्गीय पिके घेतलेल्या जमिनीत या फळांची लागवड करू नये. अत्यंत हलक्या जमिनीत फळे पोसत नाहीत.

पूर्वमशागत
लागवडीपूर्वी जमीन उभी आडवी नांगरावी. नंतर कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देवून ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. कुळव्याच्या पाळीच्या वेळी हेक्‍टरी ३० ते ४० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत सारख्या प्रमाणात मिसळावे.

लागवडीचा वेळ
लागवड शक्यतो तापमान वाढू लागल्यावर करावी. या पिकाचा कालावधी जातीपरत्वे ९०-११० दिवसांचा असतो. या पिकाची लागवड साधारण: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करावी.

लागवड पद्धत
•या पिकाची लागवड आळ्या पद्धतीने २.० x ०.५ मीटर वर करावी. कलिंगडाच्या लागवडीसाठी हेक्टरी २.५ ते ३ किलो (एकरी १ ते १.२५ किलो) बियाणे वापरावे. तसेच खरबूजाच्या लागवडीसाठी हेक्टरी १.५ ते २ किलो बियाणे वापरावे.
•बी लावण्यापूर्वी १२ तास कोमट पाण्यात भिजवावे नंतर रात्रभर बियाणे ओल्या बारदाण्यात बांधून ठेवावे यामुळे उगवण चांगली होते.
•लागवडीपूर्वी कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. लागवड करण्यापूर्वी पाणी द्यावे. वापसा आल्यानंतर आळ्यामध्ये तीन ते चार बिया १.५ ते २ से.मी. खोल लावाव्यात.

कलिंगडाचे सुधारित वाण
सुधारित वाण: शुगर बेबी, असाही यामाटो, अर्का माणिक, अर्का ज्योती
संकरीत वाण: अर्का ज्योती, संतृप्ती, अमृत
विविध खाजगी कंपनी कलिंगडाचे वाण:
यमयचडब्लू -११, यमयचडब्लू -१६, यमयचडब्लू-६, महिको हायब्रीड ४ व ५, मोहिनी, मधु, मिलन, एन.एस-२९५, एन.एस-२०६, एन.एस-१००४, नाथ अपूर्व, नाथ माधुरी, विजय, विराट, किरण, बेला, नामधारी, रेड बेबी, नर्गिस-६, मॅक्स, शुगर कींग, एलोरा महंत-१२, एलोरा मल्हार-३४, शुगर बेबी, शुगर पर्क, महिसंपरुपती, बाहूबली, मस्तानी, अर्का श्याम, आरोही, सरस्वती, विशाल
•आरोही:- वरून काळे, आतुन पिवळागार, अननासा सारखी पाणीदार
•विशाल:- वरून पिवळ, आतुन लाल गर, जास्त गोड
•सरस्वती:- वरून हिरवेगार, आतुन लाल गर

खरबुजाचे सुधारित वाण
संकरित वाण: पंजाब हायब्रीड, पुसा रसराज
सुधारित वाण: अर्का राजहंस, अर्काजित भुसार, सरबती पुसा, मधुरस, हरा मधु, दुर्गापुर मधू
स्थानिक प्रसिद्ध वाण: लखनौ सफेद, जौनपुरी जाळीदार, टोंक, खारी, शरबते अनार व बथीसा
विविध खाजगी कंपनी खरबुजाचे वाण:
यमयचसी -५, यमयचसी-६, संकरी खरबुज सोना, एनएस ७४५५ -एफ -१, एनएस ३४१६ -एफ -१, गीता, सावित्री, दोप्ती, बॉबी, कुंदन

खत व्यवस्थापन
•खताची मात्रा ही जमिनीची सुपीकता, हवामान, हंगाम यावर अवलंबून असते.
•पूर्वमशागतीच्या वेळी३०-३५ टन चांगले कुजलेले शेतखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून घ्यावे.
•कलिंगड आणि खरबूजासाठी प्रति हेक्टर १०० किलो नत्र (२१७ किलो युरिया) ५० किलो (३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५० किलो पालाश (८३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. निम्मे नत्र, संपुर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे आणि उर्वरित नत्र ३०-३५ दिवसांनी वेल शेंडा धरू लागल्यावर द्यावे.
•संकरीत वाण करिता प्रति हेक्टरी २०० किलो नत्र (४३४ किलो युरिया) १०० किलो (६२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि १०० किलो पालाश (१६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. निम्मे नत्र, संपुर्ण स्पुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे आणि उर्वरित नत्र ३०-३५ दिवसांनी वेल शेंडा धरू लागल्यावर द्यावे.
•नदीपत्रात लागवड करताना वेली उगवून आल्यानंतर पंधरा दिवसांनी १०० ग्रॅम अमोनियम सल्फेट द्यावे. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा १० ग्रॅम अमोनियम सल्फेट वेलीला देऊन भर द्यावी.
•फळांची जास्त उत्पादन घेण्यासाठी वेली वरती मादी फुलांची संख्या जास्त प्रमाणात असणे आवश्यक असते. काही संजीवकांचा कार्यश्रम वापर करून मादी फुलांची संख्या वाढविता येते. त्यासाठी टिबा हे संप्रेरक २५ ते ५० पीपीएम एवढी सहती वापरून वेलीची दोन पाने अवस्था असताना फवारणी करावी. अशा प्रकारे फवारणी केली असता मादी फुलांची संख्या वाढवून जवळपास ५० टक्के उत्पादनात वाढ होते.
•बोरॉन आणि मॉलिब्डेनम तीन पीपीएम आणि कॅल्शियम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फवारणी केली असता उत्पन्नात वाढ दिसून येते आणि फळे चांगली तयार होतात.

आंतरमशागत
बी उगवल्यानंतर कीडग्रस्त व रोगट रोपे उपटावीत व नांग्या भराव्यात. बी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यत (२० ते २५ दिवस) आजूबाजूचे तण काढून रान भुसभुशीत ठेवावे व वेलींना वेळोवेळी भर द्यावी. तसेच वेलींना वळण देऊन गादी वाफ्यावर घ्यावे म्हणजे फळे पाण्याने खराब होणार नाहीत.

पाणी व्यवस्थापन
नियमित भरपूर पाण्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे फळे तडकतात. फळे कुजू नयेत म्हणून पाणी देताना फळाशी पाण्याचा संबंध येणार नाही याची दक्षता घ्यावी. फळाच्या वाढीच्या काळात वेलांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

काढणी
फळांची काढणी ही फळ पूर्ण पिकल्यावर शक्यतो सकाळीच करावी. त्यामुळे फळांचा ताजेपणा व आकर्षकपणा दीर्घकाळ टिकून राहतो व ती चवीला चांगली लागतात. फळ काढणीला तयार झाले किंवा नाही हे काही आडाखे, निरीक्षण व अनुभवाने कळू शकते.

कलिंगडाची काढणी
कलिंगडात देठाजवळची बाळी सुकली की, ते तयार झाले असे समजावे. तयार फळ हे हाताने ठोकून पाहिल्यास 'बद' असा आवाज येतो. कलिंगडाचा जमिनीला स्पर्श करण्याच्या भागाचा पांढरट रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे. फळे तयार असल्यास देठावर लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसते. पूर्णगळ अवस्थेत फळ पिकल्यानंतर ते आपोआप गळते आणि त्याठिकाणी फळावर वर्तुळाकार खाच तयार होते.

खरबुजाची काढणी
जाळीदार खरबुजामध्ये जाळीमधील हिरवा रंग हा पिवळा होतो आणि हे जाळे मळकट पांढरे होते. लांबच्या मार्केटसाठी ३/४ गळअवस्थेत फळ काढणी करावी. फळांची काढणी ही ४ ते ५ दिवसांच्या अंतराने करावी लागवडीपासुन सुमारे ३ ते ३.५ महिन्यात काढणी सुरू होते व त्यानंतर ३ ते ४ आठवड्यात पूर्ण होते.

लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे,मृदशास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी, मो.९४०४०३२३८६
ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषि विद्या विभाग, म,फु.कृ.वि.,राहुरी

English Summary: Kalingad Cultivation Improved Cultivation Technology of Kalingad and watermelon Published on: 20 December 2023, 01:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters