Mumbai News : राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगात काल (दि.६) सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील निवडणूक आयोगात उपस्थित होते. त्यावर भाष्य करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी आज (दि.७) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते भावूक झाल्याच पाहायला मिळाले.
आव्हाड यांनी सुनावणीबाबत भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी त्यांना रडू कोसळले आहे. अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्यावर निवडणूक आयोगात करण्यात आलेल्या युक्तिवादावर बोलत असताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले. आणि त्यांना रडू कोसळले.
निवडणुक आयोगासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादादरम्यान शरद पवारांवर अनेक आरोप करण्यात आले. त्यासाठी आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आव्हाड म्हणाले की, “काल निवडणुक आयोगात माझ्या डोळ्यात अश्रू आले. शरद पवार हे संस्थानिकासारखे पक्ष चालवायचे, ते लोकशाही पद्धतीने वागले नाहीत. त्यांनी हुकूमशाह असं विधान केल्याने मी व्यथित झालो. कालपर्यंत जे विठ्ठल बोलत होते ते हुकुमशाह बोलू लागले”, असं बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांना रडू देखील कोसळले.
पुढे आव्हाड म्हणाले की, शरद पवार साहेब स्वतः दोन तास निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बसून होते. ते बोलून दाखवत नाहीत पण त्यांनाही भावनिक हल्ला झाल्यासारखं वाटलं. ज्या माणसाने आयुष्यभर लोकशाही मुल्यांचा आदर केला. पक्षातील लोकांना संधी मिळवून दिली. तीच लोकं शरद पवारांनी पक्षात लोकशाही ठेवलीच नाही, एकाधिकारशाहीसारखे वागले, हुकूमशाहासारखे वागले असे ते आता म्हणत आहेत. हे मोठं दुर्दैव आहे.
Share your comments