Jalna News : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. यामुळे विरोधकांकडून आणि मराठा समाजाकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे ग्रामस्थ देखील आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. काही ठिकाणी जोळपोळ करण्यात आली आहे. वाहनांची देखील जाळपोळ केली आहे. तर पोलिसांनी केलेल्या या लाठीचार्ज घटनेचा राज्यभरातून निधेष केला जात आहे.
या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी आहे. घटनेची सखोल चौकशी केली जाईल. तसंच घडलेल्या घटनेबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
धुळे-सोलापूर महामार्ग बंद
पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले आहेत. या संतप्त झालेल्या आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली आहे. घटनेचे पडसाद राज्यभर चांगलेच उमटत आहेत. आज बहुतांश ठिकाणी मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे.
शरद पवार जालना दौऱ्यावर
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार अंतरवली सराटी गावाला भेट देणार आहेत. तसंच लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांना रुग्णालयातून जाऊन भेट घेणार आहेत.
पुणे शहरात बंदोबस्त वाढवला
जालना येथे झालेल्या घटनेमुळे पुण्यात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेचे राज्यभरात आता पडसाद उमटत आहेत. यामुळे पुणे शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश आयुक्त रितेशकुमार यांनी दिले आहे.
Share your comments