1. बातम्या

जैन हिल्स शाश्वत शेतीचे मूर्तिमंत चित्र

जळगाव: भवरलालजींनी जैन हिल्स येथे कृषी विश्व उभे केले असून त्यांच्या कृषी तंत्रज्ञानातून साकारलेली भविष्यातील शेती शेतकऱ्यांनी आत्मसात करावी, शाश्वत शेतीची प्रेरणा घेऊन जावी. जैन हिल्स हे भविष्यातील शेतीचे मूर्तिमंत चित्र होय. आपले सरकार हे शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानणारे सरकार आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. सरकारचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंचना करिता पाणी, वीज आणि योग्य भाव दिले जातील.

KJ Staff
KJ Staff


जळगाव:
भवरलालजींनी जैन हिल्स येथे कृषी विश्व उभे केले असून त्यांच्या कृषी तंत्रज्ञानातून साकारलेली भविष्यातील शेती शेतकऱ्यांनी आत्मसात करावी, शाश्वत शेतीची प्रेरणा घेऊन जावी. जैन हिल्स हे भविष्यातील शेतीचे मूर्तिमंत चित्र होय. आपले सरकार हे शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानणारे सरकार आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. सरकारचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंचना करिता पाणी, वीज आणि योग्य भाव दिले जातील.

भवरलालजी जैन यांच्या वाक्याप्रमाणे ‘जर भारताला बलशाली बनवायचे असेल तर शेती व शेतकऱ्याचा सन्मान करायला हवा' तोच सन्मान हे सरकार शेतकऱ्याला मिळवून देणार आहोत असे सांगून जैन हिल्स येथील शेती संशोधन व प्रयोगाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले. भवरलालजींच्या परंपरेला अनुसरून पुढच्या पीढीचे कार्य सुरू आहे. या परंपरेला महाराष्ट्रात सरकार म्हणून जे जे करता येणे शक्य आहे ते ते आणि जिथे सरकारला पाठिंबा देणे शक्य आहे तो असेल याचे मी वचन देतो. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिली. भविष्यातील शेती ही माती विरहित शेती असेल. भवरलालजी जैन हे निश्चयाचे महामेरू होते. भविष्यातली शाश्वत शेती म्हणजे विचार व कृतीची उत्तम सांगड आहे आणि ती भवरलालजी जैन यांनी यशस्वीपणे साकारल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकरी बदलला तर देश बदलेल- शरद पवार

आप्पासाहेब पवार आणि भवरलालजी जैन यांनी आयुष्यभर शेतीसाठी कार्य केले. शेतकऱ्यांना उभे केले. जैन इरिगेशन नेहमीच उच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत देत असते. जैन हिल्स हा शेतकऱ्याला दृष्टी देणारा परिसर आहे. शेतकरी बदलला तर गाव बदलेल, गाव बदलला तर देश बदलेल त्यासाठी शेतकऱ्यांनी उच्च कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदराव पवार यांनी केले. वाढत असलेल्या लोकसंख्येचे पोट भरण्याची क्षमता बळीराजामध्ये आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानासह शेती केली पाहिजे. मराठवाड्यातला जालना जिल्हा हा तहानलेला जिल्हा आहे. परंतु या परिसरात चव्हाण यांनी आधुनिक पद्धतीने फलोत्पादन व शेती केली व प्रतिकूल परिस्थितीत देखील जिद्द बाळगली तर आपले ध्येय साध्य करता येते, असे पुरस्कार प्राप्त शेतकरी चव्हाण यांचे त्यांनी कौतूक केले.


मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांना "पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार-2018” देऊन गौरविण्यात आले. दोन लाख रूपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि सौभाग्य लेणे असे पुरस्काराचे स्वरूप आहे. "पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार-2018 चे मानकरी असलेले प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण हे 150 एकर शेती कसतात. त्यांनी फळबाग व भाजीपाला पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. पूर्णवेळ शेतीमध्ये ते काम करतात. त्यांचे 30 सदस्य असलेले कुटुंब आहे.

वडिलोपार्जित 150 एकरात त्यात त्यांनी सीताफळ, द्राक्षे, डाळिंब, पपई, तूर, मका, ज्वारी, भाजीपाला या पिकांची लागवड केलेली आहे. त्यांच्याकडे 6 आणि 4 कोटी लिटर्स पाण्याची क्षमता असलेले 2 शेततळे असे पाण्याचे स्त्रोत आहे. सिंचनासाठी 11 विहिरी आणि सौर ऊर्जेवर चालणारे 5 अश्वशक्तीचे 4 पंप, विजेवर चालणारे 7 पंप आहेत. त्यांचा यांत्रिकीकरणासह केल्या जाणाऱ्या शेतीवर भर आहे. त्यासाठी ट्रॅक्टर, ब्लोअर, एचटीपी पंप, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, ट्रॉली, मालवाहू पिकअप व्हॅन वगैरे आहेत. शेतीमध्ये सेंद्रीय बाबीचा समावेश व्हावा यासाठी ते गोवंश संगोपन देखील करतात.

जैन हिल्स येथे झालेल्या कार्यक्रमास माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार, कृषी मंत्री दादा भुसे, कामगार कल्याणमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. व्यासपीठावर पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय चव्हाण, सौ. चंद्रकला चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, महापौर सौ. भारती सोनवणे, खा. उन्मेश पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, आ. अनिल पाटील, आ. लता सोनवणे, आ. संजय सावकारे, माजी खा. ईश्वरलाल जैन, माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, मिलिंद नार्वेकर, ना. धों. महानोर, पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. एस. मगर, जैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी मी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जैन हिल्सला आलो होतो. तेथेच मी हा पुरस्कार मिळविणारच असा निश्चय केला. त्या दृष्टीने शेतीत काम केले. शेतकरी व गावाची स्थिती ही बदलवली. 2012 पूर्वी गावात 25 एकर फळबाग क्षेत्र होते. ते माझ्या प्रयत्नाने 600 एकर वर आणले. रोजगाराचा प्रश्न मिटून गाव आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करू लागले. पाणलोट, जलयुक्त शिवार या योजना राबवल्याने फळबागांना अतिरिक्त पाण्याची गरज भागविता आली, असे मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांचे जैन परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक अनिल जैन यांनी केले. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन व स्व. आप्पासाहेब पवार यांचे शेतीविषयी क्रांतीकारी विचार होते. ठिबकसह कृषी तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचे जीवनमानात परिवर्तन झाले. दोघांनी अवघे आयुष्य शेती, माती आणि पाणी या कार्यासाठी खर्ची घातले. त्यांच्या या कार्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळावी म्हणून हा पुरस्कार असल्याचे ते म्हणाले. ना. गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना जळगाव मध्ये केळी निर्यातीतून मोठी उलाढाल होते. केळीत संशोधन वाढावे यासाठी संशोधन केंद्र व त्यासाठी जागा मिळावी याबाबत निर्णय व्हावा अशी विनंती केली. आरंभी दीपक चांदोरकर यांनी गणेशवंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे तर आभार प्रदर्शन अशोक जैन यांनी केले.

वैशिष्टये:
• तंत्रज्ञानातून शेती करण्याचा शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यासमोर निर्धार.
• पाच हजाराच्यावर भूमिपुत्रांची उपस्थिती.
• पाच भव्य एलईडी स्क्रीन.
• चित्रफीतीतून दत्तात्रय चव्हाण यांचा शेतीविषयक परिचय.
• मुख्यमंत्री व शरद पवार यांच्या शेजारी पुरस्कारार्थी दत्तात्रय चव्हाण आणि सौ. चंद्रकला चव्हाण यांना मानाचे स्थान.

English Summary: Jain Hills Statue of the Sustainable Agriculture Published on: 25 February 2020, 08:25 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters