गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भागात पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत. उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. आज राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.
राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्राचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र हिमालय, पश्चिम बंगाल आणि सिक्किम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओडिशाचा परिसर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच दक्षिण तमिळनाडूच्या परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती कायम आहे.
तर ओडिशाच्या परिसरात काही प्रमाणात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार आहे, तर मराठवाडा व विदर्भात शनिवारपर्यंत पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात ढगाळ वातावरण, अंशत दिवसभर ऊन , तर दुपारनंतर वादळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा तयार झाला आहे. कमाल व किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे.
Share your comments