खारेपाट: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील शेती सुधारण्यासाठी व्यापक चळवळ उभारणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कृषी आयुक्त पांडूरंग वाठारकर यांनी केले. श्री समर्थ कृपा वृध्दधाम परहुर ता. अलिबाग, येथे कोकण विभागीय कृषी, फलोत्पादन, प्रक्रिया उद्योग, सिंचन, सौरउर्जा परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली. या परिषदेस प्रमुख पाहूणे म्हणून ते उपस्थितांना संबोधित होते.
निसर्गाने कोकणला भरभरुन दिले. कोकणात चांगला पाऊस पडतो याचे योग्य नियोजन करुन भात पिका बरोबरच येथील खास करुन रायगड जिल्ह्यात नाशिक अहमदनगर प्रमाणेच मोठया प्रमाणात फळे, भाजीपाला व सर्व प्रकारचे फलोत्पादन होते. त्यात वृध्दी करुन शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेत यासाठी या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी केले. परिषदेचे व यावेळी आयोजित सिध्देश्वर एग्रोटेक प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल हे होते.
देशांतर्गत व देशाबाहेर सेंद्रीय आंबा, भाजीपाला, फळफळावळ व सर्व प्रकारच्या फलोत्पादनाला असलेली मोठी मागणी विचारात घेऊन अशा प्रकारच्या उत्पादनावर भर देणे, उत्पादन वृध्दीसाठी आवश्यक ती औषधे वापरणे एपीएमसीला पर्याय म्हणून कोकणातील प्रत्येक जिल्हयाच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्रे उभारणे याच धर्तीवर रायगड जिल्हयात वडखळ सारख्या मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणे, दिसाला साधर्म्य मात्र चवीला निकृष्ट असलेल्या आंध्र व कर्नाटकच्या आंब्याचे आक्रमण रोखण्यासाठी कोकण हापूसचे ब्रांडिग करणे अलिबाग मुरुड तालुक्या बरोबरच रायगड जिल्हयात पूर्वी मोठया प्रमाणात तोंडली भाजीचे पिक होत असे.
हवामान बदलामुळे आज परिस्थिती उलट आहे. म्हणून येथील शेतकरी पुन्हा तोंडली पिकाकडे कसे वळतील यासाठी कार्यक्रम ठरविणे येथील सुप्रसिध्द सफेद कांदा उत्पादकांचे जिव्हाळयाचे प्रश्न सोडविणे हा परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे चंद्रकांत मोकल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी सेंद्रिय उत्पादनावर कराड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.निलेश मालेकर, आयुर्वेद नैसर्गिक उत्पादन व आरोग्य संपदा यावर डॉ. पी. एन. कदम भांडवली बाजारातील संधी या विषयावर एसएचसीआयएल सर्व्हिसेस लि.च्या मुख्य व्यवसाय सुधारणा कृषी विभाग सौ. व्ही. पार्वथी, जैन ईरीगेशन सिस्टिम्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.अनिल डहाके यांनी कॅनिंग उद्योगावर, कृषी पर्यटनावर मार्ट चे प्रशिक्षण प्रमुख बाळासाहेब पाटील, तसेच वारकेम बायोटेकचे व्यवस्थापक राजू पाटील, एक्सेल इंडस्ट्रिज लि.चे व्यवस्थापक सुदर्शन पलूसकर, पुष्कर केमिकल्स अँड फर्टीलायझर्सचे व्यवस्थापक संदिप रेपे तसेच आर्युवेद उत्पादनातील अमेय दापके आदींनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी फलोत्पादन आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना डॉ. पांडूरंग वाठारकर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी एसएचसीआयएल सर्व्हिसेस लि.च्या वतीने उपस्थितांसाठी विशेष सोडत काढण्यात आली. त्यामध्ये प्रभाकर नाईक तळवली व मनोहर पाटील, सागाव मारुती हे प्रथम व द्वितिय पुरस्काराचे मानकरी ठरले. एसएचसीआयएल यांच्या वतीने त्यांना भेटवस्तू देउन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी महालक्ष्मी फर्टीलायझर्स लि.चे एमडी सुरेश साळुंखे, अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यातील व रायगड जिल्हयातील व कोकणातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अलिबाग ता. प्रमुख विकास पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री समर्थ कृपा वृध्दधाम परहुर चे संचालक एड. जयेंद्र गुंजाळ यांनी आभार प्रदर्शन केले. श्री. वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
Share your comments