Budget 2024 News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.१) रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदा लोकसभेच्या निवडणुका असल्याने यावेळी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधीने शेतकऱ्यांची जीवनशैली बदलण्यात मोठी भूमिका बजावली आहे. तसंच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुढील ५ वर्षांत आणखी २ कोटी घरे बांधली जातील, अशी महत्त्वाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
२ कोटी घरे बांधली जाणार
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुढील ५ वर्षांत आणखी २ कोटी घरे बांधली जातील, असे सीतारामन म्हणाल्या आहेत. संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना कोविड असूनही आम्ही पीएम आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत ३ कोटी घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे. पुढील ५ वर्षांत आणखी २ कोटी घरे बांधली जातील.
पीएम किसान योजना, मुद्रा योजना, पीक विमा आणि पीएम स्कूल योजनेसह अनेक कल्याणकारी योजनांच्या यशाबद्दल सीतारामन यांनी संसदेत भाष्य केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, आम्ही भ्रष्टाचार संपवला आहे. प्रत्येक घराला पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्यासाठी काम करण्यात आले आहे. अन्नविषयक समस्या दूर केल्या आहेत. ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. तसंच २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे, असंही सीतारामन म्हणाल्या.
गरिबी दूर करण्यासाठी सरकार काम करत आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचे आहे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.
४ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ
शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ११.८ कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केले आहे.
तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. ५४ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे, असंही सीतारामन संसदेतील भाषणादरम्यान म्हणाल्या.
Share your comments