नवी दिल्ली: पशुधनात वाढ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढवण्यासाठी एकात्मिक कृषी व्यवस्थेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वरा पशु वैद्यकीय महाविद्यापीठाच्या आठव्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते.
अधिक समावेशक आणि शाश्वत कृषी व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेतीला पशुधनाची जोड देणे आवश्यक आहे ही परंपरागत भारतीय कृषी पद्धत आहे, असेही त्यांनी सांगितले. कुक्कुटपालन, मत्स्यपालन, दुग्धविकास अशा जोडधंद्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, त्यादृष्टीने विद्यापीठांनी या सर्व संलग्न व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्र आर्थिकदृष्ट्या लाभ देणारे ठरले तरच भारतातील युवक कृषी क्षेत्राकडे आकर्षित होतील, असे सांगत विद्यापीठांनी यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे नायडू म्हणाले.
आज देशात सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा 17 टक्के आहे. याचे महत्व लक्षात घेत या क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे यातून ग्रामीण भागात मोठी रोजगार निर्मितीही होईल, असे नायडू म्हणाले. आर्थिक स्थैर्यासाठी शेतकऱ्यांना वैविध्यपूर्ण व्यवसाय करायला मदत आणि प्रोत्साहन देणे ही सरकार, कृषी वैज्ञानिक आणि कृषी विज्ञान केंद्रांची जबाबदारी आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
Share your comments