शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती

Friday, 23 August 2019 08:14 AM


मुंबई: शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जमिनीवर एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. मंत्रालयात आज राज्यातील कृषी विकासाकरिता कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन व भविष्यात करावयाच्या उपाययोजना याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, व दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या कृषी विद्यापीठांच्या संशोधनाबाबत आढावा घेण्यात आला. 

कृषी विद्यापीठात दरवर्षी जवळपास 60 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. कृषी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एकात्मिक शेती पद्धतीचे तंत्रज्ञान शिकवून त्यांना त्यांच्या जमिनीवर उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी घेतलेल्या उत्पादनाचा नियमित आढावादेखील घेण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडे उपलब्ध जमीन, पाण्याचा साठा व उत्पादनासाठी पूरक संसाधनांची उपलब्धता लक्षात घेऊन त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर शेती अर्थशास्त्राचा अभ्यास करताना विविध क्षेत्रातील हवामान अनुकूलता, विविध भागातील जमिनींचा कस यानुसार उपयुक्त व अधिक उत्पादन देणारी महत्त्वाच्या पिकांचा आराखडा राज्यातील विविध क्षेत्रानुसार तयार करण्यात यावा असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हानिहाय पिक कार्यक्षमता क्षेत्र

कृषीमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याच्या हवामानानुसार पिक कार्यक्षमता क्षेत्र (क्रॉप इफिशियंट झोन) तयार करून त्यानुसार वाण, उत्तम शेतीपद्धती, प्रति हेक्टरी उत्पादन खर्च व उत्पन्न मापक निश्चित करण्यात यावे. याचा पिकविमा भरपाईवेळी लाभ होईल. तसेच सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी नीती आयोगानुसार शिफारस करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे पुढील उपाययोजना करण्यात याव्यात. व उन्नत भारत अभियान आपल्या कृषी विद्यापिठांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात यावे असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

कृषी विद्यापीठांनी वेळोवेळी केलेल्या संशोधनांची मार्गदर्शक तत्वे व सूचना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात तसेच एकात्मिक शेतकरी कल्याण प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्याचे हवामान लक्षात घेऊन मंडळनिहाय पिक पद्धती व उत्पादकता याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, दापोली विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत त्याचबरोबर कृषी परिषदेचे संचालक, कृषी विद्यापीठांचे संचालक संशोधक तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Dr. Anil Bonde डॉ. अनिल बोंडे integrated farming एकात्मिक शेती पिक कार्यक्षमता क्षेत्र crop efficient zone niti aayog नीती आयोग

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2019 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.