1. बातम्या

पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्याचे निर्देश

वाशिम: पावसाळा सुरु झाल्यानंतर पेरणीची कामे सुरु होतील. शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करण्याकरिता वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


वाशिम:
पावसाळा सुरु झाल्यानंतर पेरणीची कामे सुरु होतील. शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करण्याकरिता वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे तसेच वरिष्ठ अधिकारी या व्हिडिओ कॉन्फरन्सिगमध्ये सहभागी झाले होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पीक कर्ज वितरणाबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेले मात्र अद्याप कर्जमुक्ती न मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सर्व बँकांनी त्यानुसार कार्यवाही करावी. जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवून पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

हमीभावाने कापूस खरेदीसाठी नोंदणी केलेल्या सुमारे ९ हजार ३०० शेतकऱ्यांची कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. उर्वरित जवळपास २८०० शेतकऱ्यांची कापूस खरेदी सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच हमीभावाने तूर, चना खरेदीची कार्यवाही सुद्धा गतिमान करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचाही पालकमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी आढावा घेतला. लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची खबरदारी घ्यावी. परजिल्ह्यातून, परराज्यातून परतलेल्या नागरिकांचा सर्व्हे करून त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

English Summary: Instructions to speed up the disbursement of crop loans Published on: 05 June 2020, 08:52 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters