दुधातील भेसळ रोखण्याकरिता कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

Thursday, 06 February 2020 10:39 AM


मुंबई:
राज्यातील दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार करा, असे निर्देश पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी येथे दिले. पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागांतर्गत असलेल्या प्रयोगशाळा व अन्न औषध प्रशासन विभागांतर्गत असणाऱ्या प्रयोगशाळा यांच्यातील विविध तपासण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. केदार बोलत होते.

श्री. केदार म्हणाले, राज्यामध्ये दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय तपासणी मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग या तीनही विभागांच्या समन्वयाने एका पथकाची नियुक्ती करुन जकात नाका, चेक नाका, अशा विविध ठिकाणी धाडी टाकून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कारवाईमध्ये पोलिसांनाही सहभागी करुन घ्यावे.

राज्यात काही ठिकाणी भेसळयुक्त दूध आढळले असून यामुळे बालकांवर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा दुष्परिणात होतो. दूध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांचा दूध विक्री हा जोडधंदा अतिशय किफायतशीर ठरणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दूध भेसळ हा विषय गांभीर्याने हाताळावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी व गुणवत्तेची तपासणी ग्राहक व उत्पादक यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. दूध हे उत्तम अन्न असल्यामुळे उच्च गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करावयाचे झाल्यास प्राथमिक स्तरावर दुधाची प्रत उच्च असणे गरजेचे आहे. दुधाची वेगवेगळ्या पातळ्यांवर तपासण्या केल्यावरच ग्राहक व उत्पादक यांना त्यांच्या चांगल्या प्रतीविषयी व सुरक्षेविषयी खात्री देता येऊ शकते, असे श्री. केदार म्हणाले.

या बैठकीत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, आमदार रोहित पवार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त नरेंद्र पोयाम, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे, ‘पदुम’ विभागाच्या सहसचिव माणिक गुट्टे यांची उपस्थिती होती.

sunil kedar Milk adulteration milk दुध दुध भेसळ सुनिल केदार

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.