सांगली: खरीप हंगाम 2019-20 साठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा वेळीच पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी. त्यासाठी बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या दुकानांची तपासणी 30 जूनपूर्वी पूर्ण करावी. शेतकऱ्यांना बियाणे, खतपुरवठा, पाणी आणि वीजेची सुविधा, उत्पादित मालाला चांगला हमीभाव देऊन शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिले.
कृषी विभागाच्या वतीने सांगली जिल्हा खरीप हंगाम नियोजन सन 2019-20 नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस कृषि, पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, खरीप हंगाम सन 2018-19 मध्ये विविध 11 प्रकारच्या 50 हजार 353 क्विंटल बियाणांची मागणी होती. प्रत्यक्षात 55 हजार 262 क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला. सन 2019-20 मध्ये 47 हजार 372 क्विंटल बियाणांची मागणी आहे. बोगस बियाणे अथवा अन्य कोणत्याही कारणाने शेतकऱ्याचे नुकसान होऊन हंगाम वाया जाऊ नये, यासाठी भरारी पथकांतर्फे बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या सर्व निविष्ठा दुकानांची तपासणी 30 जूनपूर्वी करावी, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आणि प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांबाबत कंपनीस्तरावर पाठपुरावा करावा. पण, त्याचवेळी अपूर्ण राहिलेल्या प्रस्तावांमधील त्रृटींची पूर्तता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पूर्ण करून, शेतकऱ्यांच्या वारसांना विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा. हुमणी कीड व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासंबंधीच्या उपाययोजनांना तात्काळ सुरवात करून, त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे ते म्हणाले.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, गारपिटीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष व डाळिंब बागांचे नुकसान होते. ते टाळून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी या पिकांसाठी शेडनेटचा निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच, प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र, गावातील विशेष शेती उत्पादनाची निवड करून त्याला बाजारपेठ मिळवून देऊन प्रोत्साहन देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करू. विटा परिसरातील माती,पाणी,उती तपासणी प्रयोगशाळेची इमारत बांधून तयार आहे. पुढील बाबींसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करू.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे म्हणाले, खरीप हंगाम 2019-20 चे नियोजन करण्यात आले असून यामध्ये उत्पादनामध्ये वाढ, खर्चात बचत आणि काढणीपश्चात व्यवस्थापन यासाठी प्रकल्पाआधारित पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे. क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, कृषी उत्पादन निर्यात वृद्धी, मृद व जलसंधारण या अनुषंगाने खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप यांनी खरीप हंगामातील कार्यवाही बाबत मौलिक सूचना केल्या.
या बैठकीत गत खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीतील मुद्दे व त्यावरील कार्यवाही, राष्ट्रीय कृषी विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, खरीप हंगाम सन 2018-19 पिक पेरणी, उत्पादन व उत्पादकता अहवाल, कृषी यांत्रिकीकरण, मृद आरोग्य अभियान, बियाणे व खत पुरवठा, विस्तार योजनेंतर्गत पिक उत्पादकता, कृषी यांत्रिकीकरण, गुणवत्ता नियंत्रण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, द्राक्ष निर्यात, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, शेतकरी गट, उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पिक कर्ज पुरवठा, प्रलंबित कृषी पंपाना वीज जोडणी, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आदि योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप व कृषी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या विविध प्रसिद्धी साहित्याचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवडा शुभारंभ
दरम्यान उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवडा शुभारंभ पालकमंत्री सुभाष देशमुख आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 8 जूनपर्यंत हा पंधरवडा सुरू राहणार असून, यामध्ये विविध कृषीविषयक योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी खरीप बीज प्रक्रिया मोहिमेचा सोयाबीन बियाणास बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाव्दारे प्रारंभ करण्यात आला.
Share your comments