मुंबई: राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.
उद्योजकांना मिळते नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती
संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरित्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदांची विनामुल्य प्रसिद्धी करणे, ही यादी पीडीएफ किवा एक्सेलमध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट ऑनलाईन नोंदविणे आदी कार्यवाही करता येते. उद्योजकांना सीएनव्ही कायदा १९५९ अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येते.
संकेतस्थळावर रोजगार विषयक सर्व सेवा ह्या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामुल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.
Share your comments