मुंबई- राजकारण असो की समाजकारण नेत्यांसोबत अनुयायांची मांदियाळी निश्चितच असते. नेत्याप्रती श्रद्धाभाव जपत कार्यकर्ते हयातभर एकनिष्ठता जपतात. आपल्याप्रती असलेल्या कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठतेचे चीज नेते कितपत करतात याविषयीच साशंकताच असते. राजकारणात वावरताना आपल्या वारसाला सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देतात. मात्र, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी (sharad joshi) यांनी मृत्यूपश्चातील इच्छापत्रात ड्रायव्हरसाठी लाखो रुपयांची तरतूद करून ठेवली होती.
देशभरातील शेतकऱ्यांमध्ये शरद जोशी यांची ओळख ‘योद्धा शेतकरी’ अशी होती. विदेशातील मोठ्या पगाराच्या नोकरीचा त्याग करून भारतात दाखल झाले. शेतकरी प्रश्नांचा अभ्यास केला. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी लढे उभारले. केवळ पुरुष शेतकरीच नव्हे तर महिला शेतकऱ्यांमध्ये त्यांनी आत्मभान निर्माण केले.
सार्वजनिक जीवनात वावरताना जपलेली तत्वे शरद जोशी यांनी व्यक्तिगत जीवनातही जोपासली. आपल्या मृत्यूनंतर कष्टोपार्जित संपत्तीची विभागणी करताना त्यांनी वारसांच्या अगोदर वाहनाचा ड्रायव्हर, शेतकरी, संघटना यांचा सर्वप्रथम विचार केला.
आपल्या सोबत सावलीप्रमाणे असलेले ड्रायव्हर बबनराव गायकवाड यांच्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद त्यांनी केली. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांच्या संपत्तीबद्दल फारशी चर्चा केली जात नाही.
नेत्यांच्या संपत्तीचे गौडगंबाल केवळ चर्चेचे विषय ठरतात. शेतकरी नेते शरद जोशी यांनी आपल्या इच्छापत्रात शेतकरी, सहकारी, सेवा करणाऱ्यांचा इतकंच काय तर आपल्या ड्रायव्हरचाही विचार केला होता.
गोल्ड मेडलिस्ट ते शेतकरी नेता:
शरद जोशी यांचा जन्म ३ सप्टेंबर १९३५ रोजी सातारा येथे झाला. त्यानंतर प्राथमिक शिक्षण बेळगावला झाले तर मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून त्यांनी एमकॉम केले. बँकिंग या विषयासाठी त्यांना सी. रँडी सुवर्णपदकाने गौरवण्यात आले.
१९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या हमीभावासाठी शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व केले. शरद जोशी हे २००४ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला केला. भारताच्या शेतकरी चळवळ उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.
Share your comments