
Industries Minister Uday Samant
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आखून दिलेल्या १०० दिवस आराखड्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासु, विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड तसेच उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दावोस येथे झालेल्या करारामध्ये उद्योग विभागाने २३५ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असल्याचे सांगून उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत ४०.८९ टक्के गुंतवणूक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग संचालनालय, मैत्री, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, शासकीय मुद्रणालय आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या उद्दिष्टांची ९० ते ९५ टक्के पूर्तता झाली असून संपूर्ण उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री सामंत यांनी सर्व कार्यालयात स्वच्छता आणि नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या. उद्योग विभाग हा शासन यांनी उद्योजक यांच्यातील महत्वाचा दुवा असल्याने शासन करीत असलेली कामे सामान्यांपर्यंत पोहोचावी, उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी उद्योग सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, विकास आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
Share your comments