नवी दिल्ली: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या 10 दिवसीय "भारतीय महिलांचा सेंद्रिय पदार्थ महोत्सव 2018"ची 4 नोव्हेंबर 2018 ला सांगता झाली. हे या महोत्सवाचे पाचवे वर्ष असून तो इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला शेतकऱ्यांनी आपल्या विविध सेंद्रिय पदार्थ आणि वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री केली. यात खाद्य पदार्थांसह वस्त्रे, आरोग्य आणि सौदर्य प्रसाधने यांचा समावेश होता.
26 राज्यातून आलेल्या महिलांनी 2.75 कोटी रुपयांची विक्रमी विक्री केली. गेल्या वर्षी दिल्ली हाट येथे झालेल्या या प्रदर्शनात 1.84 कोटी रुपयांच्या उत्पादनांची विक्री झाली होती.12 लाख लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या महोत्सवात मजुली, कांगडा, लेह, पलक्कड, चिकमंगळूर, यवतमाळ, दिमापूर, अलमोडा इत्यादी ठिकाणांहून आलेल्या महिलांनी विशेष उत्साहाने या प्रदर्शनाची शोभा वाढवली.
महोत्सवादरम्यान महिलांच्या खाण्यापिण्याची, प्रवास आणि निवासाची निःशुल्क व्यवस्था करण्यात आली होती. विशेषतः शाकाहारी भोजनाच्या स्टॉलला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचे उद्घाटन 26 ऑक्टोबरला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते झाले.
मुंबईच्या उद्योजिका अनामिका यांनी बांबूपासून बनवलेले टूथब्रश आणि स्टीलच्या स्ट्रॉचे प्रदर्शन केले होते. लोकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबच्या महिला सरबजीत कौर यांनी पहिल्यांदाच या प्रदर्शनात भाग घेतला होता. विविध प्रकारच्या धान्याच्या खरेदीत लोकांना दाखवलेला उत्साह अभूतपूर्व असल्याचे त्या म्हणाल्या. त्याशिवाय, तामिळनाडू, केरळ, मणिपूर, ओदिशा, कर्नाटक आणि पश्चिम बंगालच्या महिलांनी या प्रदर्शनात आपापल्या राज्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
या महोत्सवात सहभागी झालेल्या महिलांना ई हाट मध्ये नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाने महिलांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी हे पोर्टल तयार केले आहे.
Share your comments