1. बातम्या

Indian Agriculture : हुमणी अळीचे व्यवस्थापन कसे करावे

किडीच्या उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के पिकाचे नुकसान होऊ शकते. हलकी जमिन व मध्यम ते कमी पाऊस हे हुमणीसाठी अनुकुल आहे. मागील काही वर्षापासून मराठवाडयामध्ये अनियमित पाऊस होत असल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
humani worm update

humani worm update

डॉ. राजरतन खंदारे, डॉ. अनंत लाड, प्रा. प्रज्ञा खिल्लारे

हुमणी ही अतिशय हानिकारक म्हणून महत्वाची कीड असून सद्यस्थितीत मराठवाडयात हुमणी अळीचा काही ठिकाणी खरिपातील पिकावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ही कीड बहुभक्षी असून अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळा कुरतडते. त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. खरीप हंगामात मराठवाडयामध्ये सोयाबीन, कापूस, तुर, हळद, ज्वारी, मका, ऊस इत्यादी पिकावर हुमणीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते.

या किडीच्या उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के पिकाचे नुकसान होऊ शकते. हलकी जमिन व मध्यम ते कमी पाऊस हे हुमणीसाठी अनुकुल आहे. मागील काही वर्षापासून मराठवाडयामध्ये अनियमित पाऊस होत असल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या किडीचे व्यवस्थापन करणे अवघड असून यासाठी सामुदायिकरित्या एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

जीवनक्रम -
हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात. सर्वसाधारणपने पहिल्या चांगल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमितीतून बाहेर निघतात. संध्याकाळी हे प्रौढ भुंगेरे खाद्य वनस्पतीभोवती थोडा वेळ उडतात व नंतर बाभुळ किंवा कडुनिंबाच्या झाडावर बसून रात्रभर पाने खातात. नर व मादीचे मिलन रात्री च्या वेळी या झाडावर होते. सकाळ झाल्यावर हे भुंगेरे जमिनीत लपतात. मिलन झाल्यानंतर मादी सकाळी ओलसर मातीमध्ये ७-१२ सें.मी. खोलीपर्यंत अंडी घालते.

एक मादी साधारणपणे ५० ते ७० अंडी घालते. अंडी ९ ते २४ दिवसामध्ये ऊबवून त्यामधून अळया बाहेर पडतात. अळीच्या तीन अवस्था असतात. पहिल्या अवस्थेतील अळी जमिनीतील कुजलेले पदार्थ खाते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी पिकांच्या मुळा कुरतडून त्यावर उपजिविका करते. अळीची पूर्ण वाढ ६-९ महिन्यामध्ये होते.

पुर्ण वाढ झालेली अळी जमिनीत २०-४० सें.मी. खोलीवर मातीचे कोषावरण तयार करुन त्यामध्ये कोषावस्थेत जाते. कोषावस्था २-३ आठवडयाची असते. यानंतर कोषातून प्रौढ बाहेर पडतात प्रामुख्याने प्रौढ नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात निघतात व जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात. पहिल्या पावसापर्यंत हे प्रौढ भुंगेरे अशीच जमिनीत राहतात. प्रौढ १ ते ३ महिने जीवंत राहतात. हुमणी किडीची एका वर्षामध्ये केवळ एकच पिढी तयार होते.
मे, जुन, जुलै प्रौढ सुप्तावस्थेतून निघतात व मादी अंडी घालते.

ऑगष्ट ते नोव्हेंबर अळी पिकांची मुळे कुरतडून उपजिविका करते.
नोव्हेंबर - जमिनीत कोषा अवस्था.
नोव्हेंबर ते डिसेंबर - कोषातून प्रौढ भुंगे निघतात.
जानेवारी ते मे - प्रौढ भुंगे जमिनीमध्ये सुप्तावस्थेत राहतात.


खाद्य वनस्पती : प्रौढ भुंगेरे व अळी यांच्या खाद्य वनस्पती वेगवेगळी आहेत.
-प्रौढ भुंगेरे : प्रौढ भुंगेरे हे बाभुळ, कडुनिंबाची, बोर, चिंच ई. प्रकारच्या झाडांची पाने खातात.
-अळी : अळी विविध पिकांच्या मुळा कुरतडून त्यावर उपविविका करते जसे सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, भुईमूग, सूर्यफुल, मुग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, अद्रक, भाजीपाला पिके इत्यादी.

नुकसानीचा प्रकार :
या किडीची अळी अवस्था ही जमिनीत राहून पिकाची मुळे कुरतडून खाऊन नुकसान पोहचविते. त्यामुळे झाडे सुरवातीला पिवळे पडून सुकतात व नंतर वाळून जातात. या अळीचा प्रादुर्भाव एका रेषेत दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळया जागी मोठया प्रमाणात झाडे वाळून जाताना दिसतात. अळयांनी झाडांची मुळे कुरतडल्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडे सहजरित्या उपटली जातात. तसेच जोराचे वादळ आल्यास सुध्दा ही झाडे कोलमडून पडतात.

आर्थिक नुकसान पातळी :
• एक अळी प्रति चौरस मिटर.
सद्यस्थितीतील अळीचे व्यवस्थापन :
-पिकामध्ये शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करावी. निंदणी आणि कोळपणी ही आंतरमशागतीची कामे केल्यास हुमणीच्या अळया पृष्ठभागावर येतात. ह्या अळया पक्षी वेचून खातात किंवा सुर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरतात.
-आंतरमशागत करतेवेळी शेतातील उघडया पडलेल्या अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात.
-शेतामध्ये शक्य असल्यास वाहते पानी द्यावे जेने करुन या अळ्या गुदमरून मरतील.
-शेतातील तणांचा बंदोबस्त करावा.
- प्रथम अवस्थेतील अळ्या शेनखतात आढळुन आल्यास मेटा-हायझीयम अनिसोपोली या जैविक बुरशिचा एक किलो प्रती टन शेनखतात मिसळावे.
-पिकामध्ये वापरायचे झाल्यास मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा दहा किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ही बुरशी हुमणीच्या अळयांना रोगग्रस्त करते, त्यामुळे अळयांचा बंदोबस्त होतो.
-फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रीड ४० टक्के हे मिश्र कीटकनाशक ०.४ ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून ऊस पिकाच्या आळवणीसाठी वापरावे.
-कार्बोफ्युरॉन ३ % सीजी ३३.३ किलो/हे किंवा फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रीड ४० टक्के हे मिश्र कीटकनाशक ०.३ ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून भुईमूग पिकाच्या आळवणीसाठी वापरावे.
टिपनी : मेटारायझियम ॲनिसोप्ली ही उपयुक्त बुरशी वनस्पती रोगशास्त्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे उपलब्ध आहे.


लेखक -
डॉ. राजरतन खंदारे, संशोधन सहयोगी, कृषि किटकशास्त्र विभाग, वनामकृवि,परभणी
डॉ. अनंत लाड, सहायक प्राध्यापक, कृषि किटकशास्त्र विभाग, वनामकृवि,परभणी
प्रा. प्रज्ञा खिल्लारे, सहायक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, पाथरी

English Summary: Indian Agriculture How to manage humani worm Published on: 22 September 2023, 12:27 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters