देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडल्याने तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे १४० लाख टन तांदळाची निर्यात होणार असल्याचा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी साधारण ९५ लाख टनाची निर्यात झाली होती. यावर्षी तांदळाच्या निर्यातीचा विक्रम होणार असल्याचा अंदाज तांदळाचे देशपातळीवरील व्यापारी व फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे.
यावर्षी देशात पाऊस जोरदार झाला आहे, यामुळे तांदळाचे उत्पादन वाढणार असून निर्यातीत भारत तिसऱ्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. निर्यातीमध्ये अनुक्रमे थायलंड, व्हिएतनाम, आणि भारताचा क्रमांक असतो. मात्र यंदा थायलंड आणि व्हिएतनामध्ये तांदळाचे उत्पादन घटल्यामुळे भारत निर्यातीमध्ये क्रमांक एकवर जाण्याची शक्यता आहे. थायलंडमध्ये यंदा केवळ ६० ते ७० लाख टन तांदळाच्या निर्यातीची शक्यता आहे. तर व्हिएतनाममध्ये दुष्काळामुळे तांदळाचे उत्पादन घटल्याने निर्यातमध्ये घटीची शक्यता सहा यांनी व्यक्त केली आहे. यावेळी आफ्रिकन देशांकडून बिगर बासमती तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असल्यामुळेही निर्यातीत वाढ होईल.
मागील वर्षी आपली बिगर बासमती तांदळाची निर्यात ही मागील आठ वर्षातील सर्वांत कमी झाली होती. परंतु यावर्षी तांदळाचे जास्त उत्पादन झाल्यामुळे निर्यात मागील वर्षीच्या सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे देशात परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे शहा यांनी सांगितले. दरम्यान केंद्रीय कृषी मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील निर्यातीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार बासमती तांदळाची निर्यात १३ टक्क्यांनी वाढली आहे. तर बिगर बासमती तांदळाची निर्यात १०५ टक्क्यांनी वाढली असल्याचे जाहीर केले आहे.
Share your comments