केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या नऊ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची संयुक्त आघाडी असलेल्या संयुक्त किसान मोर्चा ने येत्या 25 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे.
शेतकरी आंदोलनाच्या स्वरूप देशव्यापी चळवळीत करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.
दिल्लीच्या सिंगु बॉर्डरवर देशभरातील शेतकरी संघटनांचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारी पार पडले. या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला याविषयी बोलताना पत्रकार परिषदेत आशिष मित्तल यांनी सांगितले की गेल्या वर्षी याच तारखेला आम्ही भारत बंद आयोजित केला होता.
मागच्या वर्षापेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत दिल्लीच्या सीमांत पुरते मर्यादित असलेले हे आंदोलन देशव्यापी करण्याचा निर्णयही परिषदेत घेण्यात आला. भारतातील 22 राज्यांमधील 300 हून अधिक शेतकरी संघटना,विद्यार्थी संघटना तसेच महिला संघटना याशिवाय कामगार, आदिवासी,युवकांसाठी काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. केंद्र सरकारने तयार केलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत आणि हमी भावचा कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने कुठलाही निश्चित तोडगा निघू शकलेला नाही. सरकारने कायदे रद्द करणार नसल्याचे स्पष्ट करत कायद्यांमधील काही तरतुदी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.परंतु कायदा पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीत अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.
Share your comments