नाशिक जिल्ह्याच्या कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या तालुक्यात प्रमाणेच आता निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी या तालुक्याच्या बहुतांशी भागात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले आहे. मात्र कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या तालुक्यातील डाळिंब बागा तेल्या रोगाच्या संकटात सापडल्याने तेथील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा तोडून टाकल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी डाळिंब बागा मोठ्या जोमाने लावण्यास सुरुवात केली. बहुतांशी शेतकऱ्यांनी तेल्या रोगावर मात देखील केली व निर्यातक्षम डाळींब उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले.
परंतु यंदा पुन्हा डाळिंब बागा तेल्या रोगाला बळी पडत आहेत, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील गिरणारे नांदुर्डी रुई धानोरे रानवड सह इतर गावात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे डाळिंबास बिहार उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथून हवी त्या प्रमाणात मागणी नसल्याने चांगल्या प्रतीच्या डाळिंबास प्रति क्रेट बाराशे रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे जय महाराष्ट्र फूड कंपनीचे संचालक ईश्वर गुप्ता यांनी सांगितले.
गतवर्षी या भागामध्ये असलेल्या पाणीटंचाईमुळे डाळिंब उत्पादनावर परिणाम झाला होता तसेच उत्पादन कमी असूनही मागणी नसल्याने दरामध्ये घसरण कायम होती. त्यामुळे यावर्षी डाळिंबाला चांगली मागणी असेल या अंदाजामुळे शेतकरी होता आणि फेब्रुवारी पासून कोरोनाचे संकट निर्माण झाले हे संकट डोक्यावर असतानाच डाळिंबावर तेल्या रोगाचे संकट आले आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष देखील कांदा उत्पादक प्रमाणे डाळिंब उत्पादकांचे कंबरडे मोडणारी ठरले आहे.
Share your comments