राज्यातील काही भागात अवकाळी वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने रब्बीतील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील वाशिम, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, नगर, नाशिक, सोलापूर, आणि सातारा या जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे कांदा, गहू, ज्वारी, हरभऱ्यासह मक्याच्या पिकांचे नुकसान झाले.
राज्यात अनेक भागात सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असून काढणीला आलेल्या द्राक्षांसह डाळिंब आणि आंबा मोहरालाही वादळी पाऊस आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडीस बाभूळवाडी, जळगाव बुद्रक पिंपळखेड, परधाडी, चांदोरे, कासारी, नस्तपूरच्या शिवारात वादळी पाऊस आणि गारपीटीने काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. पिंपरखेड परिसरात झालेल्या गारांच्या तडाख्यामुळे काढणीस आलेल्या मोसंबी आणि द्राक्ष बागांना मोठा फटका बसला.
वादळी वाऱ्यामुळे गहू आडवा झाला आहे. तर काही भागातील गहू भिजला. मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाने शनिवारी आणि रविवारी पहाटे दणका दिला. काढणीला आलेली आणि सोंगून ठेवलेली पिके भिजली. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झालीत. यामध्ये मका व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. फळविके व आंबा मोहरालाही फटका बसला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्याच्या काही भागात ज्वारीचे पीक आडवे झाली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माहोळ, आणि माढा या भागात गारांसह अवकाळी पावसाने ज्वारी, गहू, हरभरा, आणि मका या काढणीस आलेल्या पिकांना त्याचा फटका बसला. द्राक्ष आणि डाळिंबच्या बागांना सर्वाधिक फटाका बसला. बार्शी भागात द्राक्षाचे क्षेत्र चांगले आहे. या पावसाने पक्व द्राक्ष मण्यांना पावसाचा चांगला मार बसला. तर काही भागात काढून ठेवलेला गहू पाण्यात भिजला आणि पाण्यात भिजल्यामुळे ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यातही गहू आणि ज्वारीला या पावसाचा फटका बसला आहे.
Share your comments