नवी दिल्ली: केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज महाराष्ट्रातील दुसऱ्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन केले. हे पार्क औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात वाहेगाव आणि धनगांव गावात आहे. तिसऱ्या मेगा फूड पार्कलाही मंत्रालयाने मंजुरी दिली असून ते वर्धा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातले पहिले मेगा फूड पार्क 1 मार्च 2018 रोजी सातारा जिल्ह्यात सुरु करण्यात आले.
पैठण मेगा फूड पार्कसाठी 124.52 कोटी रुपये खर्च आला असून 102 एकर भूखंडावर उभारण्यात आले आहे. यामध्ये ड्राय वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, प्रि-कुलिंग, रायपनिंग चेंबर्स, फ्रीझर रुम, अन्न तपासणी प्रयोगशाळा, दुधाचे टँकर्स आदी सुविधा उपलब्ध आहेत. या मेगा फूड पार्कमुळे औरंगाबाद तसेच नाशिक, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांनाही लाभ होईल.
या मेगा फूड पार्कमध्ये 250 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली जाईल आणि त्यामुळे वार्षिक उलाढाल 400-500 कोटी रुपयांवर पोहोचेल असे बादल यावेळी म्हणाल्या. या पार्कमुळे सुमारे 5,000 लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल असे त्या म्हणाल्या. या पार्कमधील अत्याधुनिक सुविधांमुळे महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या वाढीला मोठी चालना मिळेल असे त्या म्हणाल्या.
Share your comments