1. बातम्या

चिपी, सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग: गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 71 हजारांवरुन एक लाख 40 हजारांपर्यंत गेले आहे. महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

KJ Staff
KJ Staff


सिंधुदुर्ग:
गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 71 हजारांवरुन एक लाख 40 हजारांपर्यंत गेले आहे. महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

सकाळी शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय उद्योग,वाणिज्य व नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभूउद्योगमंत्री सुभाष देसाईपशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरपालकमंत्री दीपक केसरकरखासदार नारायण राणेखासदार विनायक राऊतविधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे,बाळाराम पाटीलआमदार वैभव नाईकनितेश राणेजिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंतएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगनअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. एन. वासुदेवन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या उद्घाटन सोहळ्याबरोबरच चांदा ते बांदा अंतर्गत लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण तसेच विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा तसेच विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

विमानतळामुळे विकासाची गती तिप्पट

जिल्ह्यातून जाणारा रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग यामुळे विकासाचा वेग वाढतो. तथापि जिल्ह्यात अद्ययावत विमानतळाद्वारे प्रवासी व माल वाहतुकीची विमानसेवा सुरू झाली तर विकासाचा वेग तिप्पट होतो असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले की, चिपी विमानतळाच्या परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. पण, केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष परिश्रम घेऊन या विमानतळाच्या परवानग्यांचा मार्ग सुकर केला. त्याबाबत ते अभिनंदनास पात्र आहेत. चिपी विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेल असे ते म्हणाले. आज एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या विमानतळाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळासही आता चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सी वर्ल्ड प्रकल्प लवकरच मार्गी लावणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना देणारा सी वर्ल्ड प्रकल्प रेंगाळला होता. पण जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न करु. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. भारतातील पहिल्या सागरी बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्र वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे होत आहे. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठे आर्थिक परिवर्तन होण्यास मदत होणार आहे. देवगड तालुक्यातील आनंदवाडी मासेमारी बंदराच्या निर्माणामुळे मत्स्य व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.

कोकणात 22 हजार कोटींचे प्रकल्प हाती

कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून कोकण विभागात 22 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या विविध विकास योजना राबविण्यात येत आहेत. सिंधुदुर्गचे नैसर्गिक सौंदर्य कायम राहावे यासाठी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक उद्योग या जिल्ह्यात कसे येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नीलक्रांती, सागरमाला या केंद्राच्या योजनांशी सांगड घालत मत्स्यव्यवसाय विभागाने कोकणच्या किनारपट्टीवर विविध विकासकामे सुरू केली आहेत. याबाबत मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.


या प्रसंगी बोलताना केंद्रीय वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, सिंधुदुर्ग विमानतळ पाहून सर्वांना आभिमान वाटावा अशी या विमानतळाची उभारणी झाली आहे. उडान 3 मध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नव्हता. तथापि या दोन जिल्ह्यातील क्षमतांचा विचार करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेने खास या दोन जिल्ह्यांसाठी उडान 3.1 योजना सुरू करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग व  रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच सिंधुदुर्ग विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल अशी ग्वाही देऊन ते म्हणाले, ग्लोबल एव्हिएशन समिट अंतर्गत व्हिजन 2040 या संकल्पनेद्वारे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. या अंतर्गत विमानांचे सुट्टे भाग निर्मितीचे कारखाने युवक-युवतींना विशेष प्रशिक्षण हे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगार निर्मितीस चालना मिळावी यासाठी लवकरच आडाळी, ता. दोडामार्ग येथे औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार असल्याचे सांगून उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, आडाळी औद्योगिक वसाहतीत कृषी उद्योगावर आधारित उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असे उद्योगच या ठिकाणी उभारले जाणार आहेत. याबाबत नुकतेच गोवा येथे गोवा राज्य तसेच पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजकांनी आडाळी एमआयडीसीसाठी होकार देण्याबरोबरच भूखंड घेण्यासही तत्परता दाखवली आहे. शेवटी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या एकजुटीच्या प्रयत्नाने सुंदर असे विमानतळ सिंधुदुर्गात झाल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी मत्स्य उत्पादन व मत्स्य विकासात देशात महाराष्ट्र राज्य पाचव्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट करुन ते म्हणाले मत्स्य बीजाची उपलब्धता, बंदरांचा विकास, मत्स्य व्यावसायिकांना आधुनिक साधनांचा पुरवठा यावर भर देण्यात येऊन मत्स्य क्षेत्रात राज्य आघाडीवर नेण्याचा संकल्प आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यावेळी सर्वांचे ऋण व्यक्त करुन म्हणाले की, चांदा ते बांदा योजनेमुळे येत्या सहा महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. चांदा ते बांदातील कृषी यांत्रिकीकरणामुळे आणि श्री भात लागवड पद्धतीचा वापर केल्याने जिल्ह्याची भात उत्पादन क्षमता दुपटीने वाढण्यास मदत झाली आहे. या योजनेमुळे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धोत्पादन तसेच काथ्या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील महिला तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. विमानतळासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी आतापर्यंत विशेष परिश्रम घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. याचबरोबर त्यांनी लवकरच म्हणजे येत्या 15 दिवसात विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न करावेत अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

या समारंभास माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, अजित गोगटे, पुष्पसेन सावंत यांच्यासह अतुल काळसेकर, संदेश  पारकर, मानव साधन विकास संस्थेच्या उमा प्रभू, दिपाली म्हैसकर, सुधाताई म्हैसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम तसेच चिपी व परुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधु-भगिनी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English Summary: Inauguration of Chipi, Sindhudurg Airport Published on: 06 March 2019, 07:56 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters